मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; लग्नसराई अन् पेरणीच्या कामात अडचणी, RBI ने समस्या सोडवण्याची अंबादास दानवेंची मागणी
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बॅंकांमध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. संभाजीनगर, जालना आणि नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राहकांना केवळ 100 रुपयांच्या नोटा घेण्याचा आग्रह धरला जातोय. नोटा हव्या असतील तर फक्त शंभरच्या घ्या, अन्यथा रोख रक्कम मिळणार नाही, असे मराठवाड्यातील बहुतांश बँकांमधून सांगितले जात आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बाजारपेठेत चलनाची चणचण निर्माण झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या गंभीर समस्येकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अंबादास दानवे यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात लक्ष्यवेधी पोस्ट शेअर केली आहे. मराठवाड्यातील बँकांमध्ये निर्माण झालेली ही स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे त्यांना बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी रोख रकमेची गरज असते, मात्र बँकांमध्ये नोटा उपलब्ध नसल्याने ही कामे रखडली आहेत.
तात्काळ लक्षवेधी:
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बँकांमध्ये ₹५०० च्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे रोख पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. सध्या लग्नसराईचा काळ आणि शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीचे दिवस असल्याने नागरिक अडचणीत आहेत. @RBI कृपया नाही किंवा…— अंबादास दानवे (@iambadasdanve) 9 मे 2026
तसेच सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्नासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता असलेल्या कुटुंबांना या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने मराठवाड्यातील या प्रकरणावर लक्ष घालून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी आग्रही मागणी पोस्ट द्वारे केली आहे.
Comments are closed.