धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर हल्ला
संभाजीनगर : गेल्याच आठवड्यात चक्क मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे, येथील आरोपीने ऑनलाईन चाकू खरेदी केल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली. त्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगरमध्येही (sambhajinagar) अशीच धक्कादायक घटना घडली असून छावणी परिसरातील शाळेतील एका शिक्षकावर विद्यार्थ्यानेच चाकू हल्ला केल्याची माहिती आहे. चाकू हल्ला करणारा विद्यार्थी अल्पवयीन असून चाकू हल्ल्यानंतर शिक्षकास जखमी उपचारासाठी रुग्णालयात हलवलं आहे. तर, अकोल्यात (Akola) काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची दुसरी घटना समोर आली आहे.
छावणी परिसरातील संबंधि विद्यार्थी हा शाळेतील टीसी घेण्यासाठी आला होता, हा विद्यार्थी अल्पवयीन असून पूर्वीदेखील शाळेत असताना वर्ग शिक्षकांसोबत त्याचे वाद झाले होते. आजही टीसी घेण्यादरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर विद्यार्थ्याने थेट शिक्षकावर चाकूहल्ला केल्याने शाळेत खळबळ उडाली. विशाल धूशिंग असं शिक्षकाचे नाव असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्याने देखील चाकू ऑनलाइन मागवला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे, ऑनलाईन मिळणाऱ्या धारधार शस्त्रांचा मुद्दा समोर येत आहे.
अकोल्यात काँग्रेस नगरसेवकाच्या पतीवर हल्ला
अकोल्यात काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर भर रस्त्यात जीवघेणा हल्ल्याची घटना घडली. अकोला महापालिकेच्या प्रभाग 17 च्या नगरसेविका ‘रफिया बी’ यांचे पती याकुब खान उर्फ याकुब पैलवान यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलसमोर गर्दी केली. तर, हल्लाखोर पळून जात असताना पोलिसांनी त्यास अटक केली आहे. दरम्यान, हा जीवघेणा हल्ला नेमकं कोणत्या कारणावरून झाला याची माहिती अद्याप कळू शकली नाही. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पतिवर हल्ला झाल्याची घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.