भटक्या कुत्र्यापासून जीव वाचवताना विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, बदलापुरातील हृदयद्रावक घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिकवणी सुटल्यानंतर बारावीत शिकणारा हर्षल शिंदे हा दुपारच्या सुमारास मित्रांसोबत आपल्या घरी पायी जात होता. त्याचवेळी अचानक रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले काही भटके कुत्रे त्याचा पाठलाग करू लागले. या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हर्षल वेगाने धावू लागला. काही अंतर गेल्यानंतर तो एका दुकानात शिरला. तो प्रचंड घाबरला होता. दुकानात जाताच काही क्षणात हार्ट अटॅकमुळे तो थेट जमिनीवर कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

बारावी विज्ञान शाखेत शिकणारा हर्षल शिंदे हा बदलापूर पश्चिम येथील मोहनानंद परिसरात राहत होता. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे शिकवणीला गेला. त्यानंतर मित्रांसोबत गप्पा मारत तो घरी जात होता. मात्र भटक्या कुत्र्यांनी त्याचा चावा घेण्याचा पाठलाग केल्याने हर्षल घाबरला व जोरात धावू लागला. एका दुकानात आश्रयासाठी तो शिरला. तेथील महिलेला माझ्यामागे कुत्रा लागला असल्याने मी आत आलो असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर लगेच तो खाली निपचित पडला. दुकानदार महिलेने व त्याच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एका शाळेच्या व्हॅनमधून हर्षल याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदयविकारामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे हर्षलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

निर्बीजीकरणाचे पैसे कुठे गेले?

या घटनेमुळे बदलापूर शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात वाढली असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही श्वानांची संख्या आटोक्यात का येत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

Comments are closed.