सुधीर मुनगंटीवारांचा भाजपमध्ये ‘एकनाथ खडसे’ होणार का? पक्ष नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिका

नागपूर : क्रमांक एकचा पक्ष बनलेल्या भाजपमध्ये एकेकाळी जे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या बाबतीत घडले, तेच सध्या सुधीर मुनगंटीवार (सुधीर मुनगंटीवार) यांच्या बाबतीत होत आहे का? मुनगंटीवार स्वतःला एकनाथ खडसेंच्या भूमिकेत नेऊन स्वतःचा राजकीय तोटा करून घेत आहेत का? गेल्या काही महिन्यातील मुनगंटीवारांची पक्षविरोधी भूमिका, वरिष्ठांच्या विरोधात वक्तव्यं पाहिल्यानंतर असे प्रश्न विचारले जात आहेत.

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजयरथ वेगात धावला. मात्र भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र भाजपचा विजयरथ रोखण्यात काँग्रेसला यश आले. चंद्रपूर जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांसह मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील मूल आणि बल्लारपूर या दोन नगरपरिषदांमध्येही भाजपचा दारुण पराभव झाला.

  • मूलमध्ये भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुमारे अडीच हजार मतांनी पराभूत झाला.
  • काँग्रेसच्या 18 नगरसेवकांच्या तुलनेत भाजपचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले.
  • तीच गत मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बल्लारपूरमध्ये झाली.
  • बल्लारपूरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला.
  • 34 पैकी फक्त 7 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्यामुळे मुनगंटीवार यांचा अनेक वर्षांचा हा बुरुज ढासळला.

Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis : पक्ष नेतृत्वाच्या विरोधात टीका

चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवार यांची तोफ विरोधकाऐवजी आपल्याच पक्षातील नेतृत्वाच्या विरोधात चालताना दिसून येत आहे. चंद्रपूरसह मूल आणि बल्लारपूर मधील पराभवाची कारणमीमांसा करताना मुनगंटीवार यांनी पक्षावर त्यांना शक्तिविहीन केल्याचा गंभीर आरोप केला. विधानसभा निकवडणुकीत सातव्यांदा जिंकल्यानंतरही यंदा त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे शल्यही मुनगंटीवार यांनी बोलून दाखवले.

सुधीर मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांची नाराजी वेगळ्या शब्दात बोलून दाखवत एका प्रकारे राज्यातील भाजप नेतृत्वाला इशाराच दिला. मुनगंटीवार यांनी भाजपमधील नाराजांची ते मूठ बांधणार असे राजकीय संकेत दिले.

मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची ही नाराजी भाजपच्या इतर नेत्यांनी वेळीच हेरली आणि सावध प्रतिक्रिया दिली. चंद्रपुरातील पराभवाबद्दल आम्हाला आत्मचिंतन करावे लागेल, आम्ही मुनगंटीवार यांच्यासोबत बोलू. त्यांची भूमिका योग्य असली, तरी पराभवाचा संबंध मंत्रिपद असणे किंवा नसणे याच्याशी जोडता येत नाही असे बावनकुळे म्हणाले.

Eknath Khadse BJP : मुनगंटीवारांचा खडसे होतोय का?

मुनगंटीवार यांच्या अवतीभवती होत असलेल्या सर्व घडामोडी पाहता, 2014 ते 19 मध्ये जे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात घडले, तेच आता सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल घडत आहे की काय अशी शंका राजकीय विश्लेषकांच्या मनात येत आहे.

इच्छा नसताना लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या मुनगंटीवारांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेत मुनगंटीवार यांनी कमबॅक करत चंद्रपुरात भाजपला यशही मिळवून दिले होते. मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये असतानाही मुनगंटीवार यांनी एका प्रकारे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावणी सुरू केली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवार त्याच रंगात दिसले. कधी त्यांनी महायुती सरकारच्या नवख्या मंत्र्यांना नियमांच्या पेचात अडकवले, तर कधी सभागृहात ज्येष्ठ मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घरचा आहेर दिला. राज्यात गाजत असलेल्या बिबट्यांच्या प्रकरणी तर मुनगंटीवारांनी विद्यमान वनमंत्री आणि त्यांच्या विभागाचे अक्षरश धिंडवडे काढले.

शिड गर्ड फोर आपल्याच सरकारला लक्ष्य

सुधीर मुनगंटीवार राज्यातील भाजपच्या अभ्यासू आणि विधिमंडळातील बारीक-सारीक नियमांची इत्यंभूत माहिती असलेले नेते मानले जातात. विधिमंडळात त्यांची उपस्थिती भाजपच्या मोठ्या संख्येने निवडून आलेल्या नव्या आमदारांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. मात्र मुनगंटीवार विधिमंडळाच्या आत असो किंवा बाहेर, ते वारंवार आपल्याच सरकारला टार्गेट करून स्वतःला एकनाथ खडसे यांच्या मार्गावर घेऊन चालले आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुधीर मुनगंटीवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस : फडणवीसांसोबत संबंध ताणले

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार जरी नितीन गडकरी यांच्या गटातले मानले जात असले तरी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे राजकीय संबंध आज जेवढे ताणलेले आहेत, तेवढे पूर्वी नव्हते. 2014 ते 2019 या काळात सुधीर मुनगंटीवार फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आणि वनमंत्री होते.

सन 2014 ते 19 च्या काळात मुनगंटीवार यांनी फडणवीस सरकारमध्ये फक्त महत्त्वाचे विभागाच सांभाळले नाही तर ते सरकार आणि पक्षाचे संकट मोचकही होते. त्याकाळात मुनगंटीवार यांनी तुलनेनं ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मोलाची साथ दिली होती. अनेक क्लिष्ट विषयांवर विरोधकांचे हल्ले ते परतवून लावायचे.

चंद्रपूरचे राजकारण: नाराजीनाट्याला कुठून सुरुवात?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा चंद्रपूर लोकसभेत धक्कादायक पराभव झाला आणि यासाठी बऱ्याच अंशी सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरण्यात आलं. त्यानंतर 2021 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मुनगंटीवार यांना तुलनेने कमी महत्त्वाचं सांस्कृतिक खातं देण्यात आलं. मात्र मुनगंटीवार यांची खरी नाराजी समोर आली ती 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान. मला लोकसभा लढवायची नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं. एक प्रकारे हे पक्षाच्या निर्णया विरोधातील मतप्रदर्शन होतं.

या निवडणुकीत मुनगंटीवार यांचा मोठ्या अंतराने पराभव झाला. विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बल्लारपूर मतदारसंघात देखील मोठी पिछाडी मिळाली. याच दरम्यान किशोर जोरगेवार यांना भाजपात प्रवेश देण्यावरून देखील त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वारंवार खटके उडाले. मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीपर्यंत जात आपला व्हिटो वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र मुनगंटीवार हे किशोर जोरगेवार यांना भाजपात येण्यापासून रोखू शकले नाही आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा नवीन अध्याय सुरू झाला.

सुधीर मुनगंटीवार बातम्या : मंत्रिपद न मिळाल्याची खंत

2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभेत निवडून गेले. जिल्ह्यात भाजपचे देखील सहा पैकी पाच आमदार निवडून आले. त्यानंतर मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशीच अपेक्षा होती. मात्र मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आणि तेव्हापासून मुनगंटीवार यांनी अनेक वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली.

जानेवारी महिन्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री मारुती कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात देखील सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिले होते. ऑक्टोबर महिन्यात मुनगंटीवार यांची अमित शहा सोबत दिल्लीत भेट झाली आणि त्यानंतर लवकरच मुनगंटीवार यांची नाराजी दूर होऊन त्यांचं पुनर्वसन होईल अशी चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा मुनगंटीवार नाराज झाल्याचे आणि आपल्याच पक्षाविरोधात बोलत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुनगंटीवार ज्या पद्धतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षाविरोधात बोलत आहेत, ते पाहता मुनगंटीवार नाराज आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मात्र त्यामुळे मुनगंटीवार स्वतःचा एकनाथ खडसे करून घेत आहे की पक्षातील काहीजण मुनगंटीवार यांना हळूहळू एकनाथ खडसेंच्या स्थितीत ढकलत आहेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.