अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण

मुंबई : महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून एसआयटीमार्फत त्याचा तपास सुरू आहे. मात्र, अनेक बड्या नेत्यांसमवेत त्याचे फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. आता, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी खरातसोबतच्या फोटोबाबत खुलासा केलाय. अशोक खरात त्यांचे कृत्य घृणास्पद आहे, त्याचा निषेध करतो. मात्र, त्यांच्या ओळखीच्या लोकांना यात गुंतवणे आणि फोटो प्रसिद्ध करणे ही चुकीची बाब आहे. अशोक खरातसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार श्रीकांत शिंदे आणि मी एकत्र असल्याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असे म्हणत केसरकर यांनी व्हायरल फोटोमागची स्टोरी सांगितली आहे. ईशान्येश्वर मंदिरासाठी एक रस्ता बनविण्यासंदर्भात अशोक खरात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हाच माझी आणि त्यांची ओळख झाली असे दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी स्पष्ट केले.

मी मुंबईच्या बाहेर असल्याने अशोक खरात प्रकरणावर काही खुलासे करु शकलो नाही. त्यामुळे, व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडतोय, माजी मंत्री तथा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी म्हटलं. इशान्येश्वर मंदिरासाठी एका रस्त्याच्या कामाबाबत ते मुंबईत आले असताना माझी आणि त्यांची ओळख झाली, त्यावेळचा तो फोटो आहे. नाशिकमधील इशान्येश्वर मंदिरामुळे आमची ओळख आहे, तसेच त्यांचा एस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी ओळख आहे. दुसरा फोटो त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेचा आहे, पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल माझी आणि त्यांची कधीही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी अशोख खरात प्रकरणावरील व्हायरल फोटोच्या संदर्भाने दिले आहे. तसेच, माझ्यासारख्या अनेक राजकीय लोकांचे केवळ फोटो आले म्हणून आरोप करणे हे चुकीचे आहे.

अशोक खरात माझ्या ऑफिसमध्ये कधीच आले नाहीत

माझ्या ऑफिसमध्ये ते कधीच आले नाही, त्यामुळे ते माझे खातं चालवत होते असे म्हणणे चुकीचे आहे. ते माझं डिपार्टमेंट कसं चालूव शकतील, कारण ते कधीच माझ्या खात्यात आले नाहीत. माझ्या कार्यकाळात शिक्षण खात्यात अनेक चांगले निर्णय मी घेतले आहेत. माझ्याच कार्यकाळात शिक्षण विभागासाठी अधिक चांगले निर्णय झाले आहेत, असे मी मानतो, असेही केसरकर यांनी म्हटले. केसरकर यांनी संजय राऊत यांनी कलेल्या टीकेसंदर्भात प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते संजय राऊत

केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या याच खरात बाबाच्या शिफारशीने होत असत. त्याकामी बाबा अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंटमध्ये मुक्कामास असत, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा

खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार का? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले

आणखी वाचा

Comments are closed.