राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत काही आक्षेपार्ह नाही – आयुक्त अमितेशकुमार

पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर (Rahul solapurkar) यांनी एका पॉडकॉस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चांगलाच गदरोळ उठला असून राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच, राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे, आता आंबेडकर अनुयायी देखील राहुल सोलापूकर यांच्या वक्तव्याबद्दल संतप्त झाले असून ठिकठिकाणी निदर्शने व अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोलापूरकर यांच्या पुण्यातील (Pune) घरासमोरही शिवभक्त आणि आंबेडकर अनुयायांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे, पोलिसांनी राहुल सोलापूकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी, आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (अमितेशकुमार) यांनी भूमिका स्पष्ट केली.

राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी तपासले आहेत,  या व्हिडिओमध्ये अजून तरी काही अक्षेपार्ह सापडलं नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिला आहे, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो पोलीस बंदोबस्त आहे. गरज पडली तर राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटलं आहे. तसेच, अजून तरी राहुल सोलापूरकर यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती देखील अमितेशकुमार यांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु ठेवणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरने याबाबत माफी मागितली आहे. राहुल सोलापूरकरने पॉडकास्टमधून शिवाजी महाराज यांच्या आग्रातील सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, शिवभक्तांनी संताप व्यक्त केला, तर नेतेमंडळीहींनी अभिनेत्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज व खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील राहुल सोलापूकर यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त करत त्याला गोळ्या घालायला पाहिजे, असे म्हटले होते.

राज्यभरातून होत असलेला संताप पाहून राहुल सोलापूकर याने माफी मागितली. मात्र, त्यानतंर, त्यांच आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचं त्यांनी म्हटलें होतं. त्यामुळे, आंबेडकर अनुयायांनी संताप व्यक्त करत राहुल सोलापूकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इशाराही दिला होता. त्यामुळे, अभिनेत्याने पुन्हा माफी मागितली.

काय म्हणाला राहुल सोलापूकर

शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक चुकीचा शब्द गेला आणि शिवभक्तांची मी जाहीर माफी मागितली. लाच शब्द बोललो, मी अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागितली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मी बोललेला असा एक व्हिडिओ समोर आला.  बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी अनेक व्याख्याने देत असतो, तरी हे का केलं जात आहे, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. महान व्यक्तीला कलाशीत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार नाही, असंही सोलापूरकर यांनी एका व्हिडिओतून म्हटलं आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.