शहाजीबापूंचा तानाजी सावंतना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
सोलापूर : शिवसेनेचे माजी आमदार आणि गुवाहटी फेम शहाजी बापू पाटलांनी (Shahaji bapu patil) शिवसेना नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांना सल्ला दिलाय. सोलापूर माहेर आहे…. आई-वडिलांचे प्रेम इथे आहे, थोडं सोलापुरातही लक्ष द्या असे म्हणत तानाजी सावंत यांनी केवळ धाराशिवमध्ये लक्ष न देता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावेत, असे शहाजी बापूंनी सूचवले. तर, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेवार (जयकुमार गोरे) हल्लाबोल केला. निधी देणारा माणूस इथं स्टेजवर बसलाय असे म्हणत भालके यांनी एकनाथ शिंदेंकडे हात करत जयकुमार गोरेंना डिवचलं आहे.
तानाजी सावंत धाराशिवला गेल्यापासून सोलापूरच्या वाट्यालाच नाहीत. तानाजी सावंतांनी सोलापुरात लक्ष दिले तर चार-पाच आमदार शिवसेनेचे निवडून येतील,असे म्हणत शहाजी बापू पाटलांची एकनाथ शिंदेंना विनंती तर तानाजी सावंतांना सल्ला दिला. राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिवला जाऊन बसल्यापासून आमच्या वाट्यालाच येत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आपण 2019 सालाप्रमाणे तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा सोलापुरात लक्ष द्यायला लावा. 4- 5 आमदार शिवसेनेचे निवडून येतील. तानाजी सावंत सर, धाराशिव तुमची सासुरवाडी आहे. तुमचं घर सोलापूर जिल्हा आहे. माहेर इथ आहे. आई-वडिलांचे प्रेम इथे आहे. त्यामुळे सोलापुरात लक्ष द्या… असा सल्लाच शहाजी बापू पाटील यांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्यासमोरच शहाजी पाटील यांनी तानाजी सावंत यांना दिलेला सल्ला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणत आहे. दुसरीकडे भगिरथ भालकेंनीही जयकुमार गोरेंना आव्हान दिलंय.
शिवसेनेत प्रवेश करताच भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट आव्हान दिलंय. त्यामुळे, भविष्यात भाजप-शिवसेना भिडणार असल्याचं दिसून येतंय. सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी नगरपालिका निवडणुकीत निवडून आल्यावर निधी कुठून आणणार? असा प्रश्न केला होता त्याला भगीरथ भालके यांनी उत्तर दिले, हा बघ निधी देणारा माणूस इथे बसलाय, असे म्हणत गोरेंना डिवचलं. भगीरथ भालके यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे यांनी त्यांना पाठवले होते.
निधी देणारा माणूस इथं स्टेजवर बसलाय
नगरपालिका निवडणूक प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मतदारांना आवाहन केलं होतं, जरी भालके निवडून आले तरी निधी कुठून आणणार, कुणाकडे जाणार, कोणाला मागणार? त्यांना माझ्याकडेच यावं लागेल. भगीरथ भालके यांनी आज प्रवेश झाल्याच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आव्हान दिले. निधी देणारा माणूस इथे स्टेजवर बसलाय, येऊन बघ अशा पद्धतीने भालके यांनी थेट पालकमंत्र्यांना आता अंगावर घेतलं आहे. त्यामुळे भविष्यात भाजप विरुद्ध शिवसेना असाच कलगीतुरा पंढरपूरमध्ये पाहायला मिळणार असल्याचे दिसून येते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.