काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललं
नागपूर : राज्यात एकीकडे विधानपरिषद निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असतानाचा चंद्रपूर आणि गडचिरोलीत काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्यातच, काँग्रसचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी आपली भूमिका मांडली. आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील नगरसेवक नॉट रिचेलबल असून मी शंभर टक्के सांगतो, पाच -पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे. पैशाने आमचे सगळे लोक विकली गेली आहेत, आता आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरांवर चिपकवणार आहोत, त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करू, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्यासमवेतचा नगरसेवकांचा फोटो समोर आला आहे. त्यासंदर्भात, फोटो कधीचा आहे, तो जुना आहे की आत्ताचा आहे हे मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे की, चंद्रपूरमध्ये घोडा बाजार तेजीत आहे. या घोडे बाजाराची गरजही नव्हती, पण आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गर्मी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे. बिनाश्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर राजकारणात काय नीतिमत्ता राहिल, असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी विारला आहे. सत्ता आणि पॉवर दोन्ही एकत्र घेऊन काम होत राहिलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहेत, असेही त्यांनी म्हटलं.
सत्तेचा धाक दाखवून, धमकी देऊन राजकारण
काँग्रेसला स्वत:च नगरसेवक सांभाळता येत नाहीत, असा आरोप केला जात असल्यासंदर्भातही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. राज्यात जर सत्ता नसती तर कुत्रंही मागे गेलं नसतं, सत्ता जाऊ दे आणि ने म्हणा उचलत, कोणात किती दम आहे. सत्तेचा उपयोग करुन काही लोकांना घाबरवलेलं आहे, बँकेच्या संचालकांना, सरपंचाच्या मुलाला तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन राजकारण सुरू आहे. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो पाच- पाच लाख रुपये देऊन नगरसेवकांना नेण्यात आलं आहे, माझ्याकडे तसे पुरावे आहेत, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत, किती किती पैसे घेतले, जे झालं ते क्लिअर आहे, आता ऍडव्हान्स दिला आहे पुन्हा काही देतील. कोणी म्हणतं दहा लाख देऊ, कोणी म्हणतो 15 लाख देऊ, कोणी म्हणतो काँग्रेसचे डबल देऊ अशी चर्चा असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
बंटी भांगडिया म्हणाले, नगरसवेक सांभाळायची माझी जबाबदारी नाही
काँग्रेसचे 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल आहे. मात्र मी काही काँग्रेस नेता नाही, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांना सांभाळण्याची जवाबदारी ही माझी नाही. मी त्या भागातील आमदार असल्याने माझ्या मतदारसंघातील अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायत मधील नगरसेवक माझ्या संपर्कात असतात, त्यांचे काम करून घेण्यासाठी ते आमदार म्हणून माझ्या संपर्कात असतात. पण निवडणुकीच्या अनुषंगाने मी कोणाशीही संपर्कात नाही. मात्र भाजपचा कार्यकर्ता असल्याने निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मदत होईल, असा माझा प्रयत्न असतो. असं सूचक विधान चिमूर विधानसभेचे आमदार आणि भाजप नेते बंटी भांगडिया यांनी केला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.