केकेआरच्या 25.20 कोटीच्या खेळाडूने का नाही केली बॉलिंग? कॅप्टन रहाणेने दिले स्पष्टीकरण

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२६ च्या हंगामातील एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. शुक्रवारी (१७ एप्रिल) त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. संघाची कामगिरी निराशाजनक कामगिरी आणि त्यांच्या २५ कोटीच्या एका खेळाडूने पुन्हा एकदा गोलंदाजी केली नाही. तो गोलंदाजी का करत नाही, यावर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्टीकरण दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन याने जीटीविरुद्ध गोलंदाजी केली नाही. त्याने असे का केले यामागचे कारण समोर आले आहे. १९ व्या आयपीएल हंगामासाठी केकेआरने ग्रीनला २५.२० कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. त्याने हा आयपीएल हंगाम सुरू झाला असता गोलंदादीज केली नव्हती. तेव्हा रहाणेने ग्रीनच्या कामाचे व्यवस्थापन नीट न केल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दोष दिला होता, मात्र आता त्याने ग्रीनला तीव्र स्वरुपाचे क्रॅम्प्स आल्याने गोलंदाजी केली नाही असे सांगितले आहे.

जीटीविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा ग्रीनने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ७९ धावा केल्या. तसेच रोवमन पॉवेलच्या २७ धावा यामुळे केकेआरने २० षटकात सर्व विकेट्स गमावत १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात जीटीचा कर्णधार शुबमन गिलने प्रभावी कामगिरी केली. त्याने ५० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ८६ धावा केल्या. त्याने जोस बटलर आणि साई सुदर्शनसोबत उत्तम भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना जीटीने २ चेंडू आणि ५ विकेट्स शिल्लक राखत जिंकला.

केकेआरचा हा या हंगामातील सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यानंतर रहाणे माध्यामांशी बोलताना मान्य केले की सततच्या पराभवानंतर माध्यमांना सामोरे जाणे कठीण असते. तो म्हणाला, “सामना हरल्यानंतर लगेचच पुढे येऊन बोलणे कधीच सोपे नसते, पण मला सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ग्रीनला तीव्र स्वरुपाच्या क्रॅम्प्सचा त्रास झाला, यामुळे तो आत-बाहेर करत होता आणि याच कारणामुळे त्याने गोलंदाजी केली नाही.”

रहाणेने ग्रीनच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. त्याबद्दल तो म्हणाला, “ग्रीनची खेळी उत्तम होती, त्याने ज्याप्रकारे गोलंदाजांवर हल्ले चढवले, ते पाहणे अप्रतिम होते. १४७ धावांवर ५ विकेट्स अशी स्थिती असताना त्याने संघाला एका आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.”

जीटीविरुद्ध पराभव झाल्यानंतरही रहाणेने त्याच्या गोलंदाजांचे गोडवे गायले आहे. तो म्हणाला, “मी अजुनही गोलंदाजाना श्रेय देऊ इच्छितो. जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घड नसतात तेव्हा ते सोपे नसते, मात्र त्यांनी पुनरागमन करण्याचे जोरदार प्रयत्न केले.”

रहाणेने याआधी ग्रीन गोलंदाजी करत नव्हता तेव्हा नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता शुक्रवारी पुन्हा तेच घडले त्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

Comments are closed.