राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार आज निवडणूक आयोगाकडे जाणार नाही; नेमकं कारण काय?


उधव ठाकरे-राजा ठाकरे-सरद पवार मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. काल शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. यावेळी समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मात्र आजच्या निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित नसणार आहे.

शरद पवार आजच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत  निवडणूक आयोगाकडे जाणार नाहीय. शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला जाणार आहेत. थोड्याच वेळात शरद पवार पुण्यासाठी रवाना होणार आहे. शरद पवार आज शिष्टमंडळासोबत नसतील. मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित असतील. उद्धव ठाकरे, राज ठाकरे देखील असतील. मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख, प्रकाश रेड्डी या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती. मंगळवारी चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय? (What is the delegation meeting with the EC?)

निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
लोकशाही बळकट करण्यावर चर्चा
स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी
महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलं? (Mahavikas Aghadi News)

प्रति,

मा. श्री. एस. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

विषय :- निवडणूक आयोगाच्या कारभारात अधिक पारदर्शिता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंबंधी.

प्रेमाने जय महाराष्ट्र,

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परंतु २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असे आम्ही सगळेच मानतो, पण सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर, खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, अशी शंका उत्पन्न होत आहे. असो. निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं. आम्ही मानतो आणि त्यामुळेच एकूण राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृतीदेखील अपेक्षित आहे.

1) २०२४ मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळलीदेखील गेली… पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत, त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावे ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत. कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे.

2) महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ ला झाल्या आणि त्यादरम्यानची मतदार यादी ३० ऑक्टोबर २०२४ ला प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ च्या दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली, ती नावं व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसालासुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही आहे. ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा?

3) निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं. म्हणजे जुलै २०२५ नंतर ज्यांचं वय १८ पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे ५ वर्षे थांबायचं? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो जो मतदार १८ वर्षांचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा.

4) महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणेकल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यातदेखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात दोन दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये, ही जबाबदारी निश्चितच आहे निवडणूक आयोगाची आहे. पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर मग महाराष्ट्रात तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी का दिसत नाही आहे? दुबार नोंदणी काढण्यासाठी ‘डी-डुप्लिकेशन’ पद्धतीचा वापर करावा.

5) महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं, असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की, व्हीव्हीपॅटसोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत? मुळात २०२२ मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता २०२६ मध्ये होणार आहेत. मग चार वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते? आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहे? सामान्य जनतेचा ईव्हीएमवरच विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘व्हीव्हीपॅट. तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?

6) वरं, प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की! खर तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? त्यांचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी तरी चार चार वेळा मतदान का करायचं? निवडणुकांनंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचं? तेच नगरसेवक आपापसात क्रेडिटसाठी आणि (इतर) गोष्टींसाठी भांडत बसतात. मग प्रभागातील कोण बघणार? ही अशी निवडणूक पद्धत तर संपूर्ण भारतात कुठेच नाहीये मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे? सत्ताधायींच्या सोयीसाठी का? असो.

पण मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही, तिथे पण निवडणूक आयोग VVPAT सुविधा असलेली ईव्हीएम मशिन्स देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की, मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बैलेट पेपरवरच घ्या.

निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल संपूर्ण देशपातळीवर शंका आहेत. निवडणूक आयोगानेच जर स्वायत्ता दाखवली नाही तर कोण दाखवणार? त्यामुळे निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी. या मागण्या किंवा उपाय या फक्त राजकीय पक्षांच्यांच आहेत असं नाही, तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब आहे आणि याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल, अशी आशा व्यक्त करतो, असं महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray-Raj Thackeray Meets Election Commission: काल समाधानकारक उत्तर नाही; उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार

Comments are closed.