सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर विजय; 10 रंजक घडामोडी
मुंबई : सर्वांचं लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून त्यामध्ये भाजपने बाजी मारल्याचं दिसून येतंय. भाजपने सर्वाधिक म्हणजे 129 ठिकाणी विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिदे यांच्या शिवससेने 54 ठिकाणी, दादांच्या राष्ट्रवादीने 40 ठिकाणी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या काँग्रेसने 34 ठिकाणी, पवारांच्या राष्ट्रवादीने 7 तर ठाकरेंच्या शिवसेनेने 8 ठिकाणी विजय मिळवला.
ही निवडणूक गाजली ती काही ठिकाणच्या रंजक लढतींमुळे आणि घटनांमुळे. या निवडणुकीतील रंजक घडामोडी खालीलप्रमाणे,
लोहा नगर परिषद निकाल : नांदेडमध्ये एकाच घरातील सहा जणांचा पराभव
नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेची निवडणूक यंदा घराणेशाहीच्या मुद्द्यावरून चांगलीच चर्चेत राहिली. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिलं होतं. त्यामध्ये सर्व सहा जणांचा पराभव झाला.
भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना तर नगरसेवक पदासाठी तिकीट दिलं होतं. तर गरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या एकाच टुकुंबातील पाच जणांना तिकिट दिलं होतं. मतदारांनी मात्र सर्वांनाच पाडल्याचं दिसून आलं. लोहा नगराध्यक्षपदी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला.
शिरोळ नगर पंचायत निवडणूक: भाजप आमदाराच्या घरातील तिघांचा पराभव
हातकणंगले मतदारसंघाचे भाजपचे आमदार अशोकराव माने (अशोकराव माने) यांना मतदारांनी जोरदार झटका दिला आहे. शिरोळ नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत अशोकराव माने यांच्या सूनबाई सारिका अरविंद माने यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये मुलगा अरविंद अशोकराव माने यांचा सुद्धा दारुण पराभव झाला. तसेच त्यांच्या पुतण्याला सुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवत एक प्रकारे घराणेशाही हद्दपार करून टाकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीची चांगलीच चर्चा सुरू आहे.
फलटण नगर परिषद निकाल : फलटणमध्ये रामराजेंच्या 30 वर्षांच्या सत्तेला धक्का
फलटण नगरपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांचे चिरंजीव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिकेत राजे निंबाळकर यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल 600 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
फलटण नगरपरिषदेच्या एकूण 27 जागांपैकी 16 जागांवर भाजपने विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या निकालामुळे रामराजेंच्या 30 वर्षांच्या सत्तेला धक्का देत भाजपने नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर फलटणच्या डीएड चौकात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
सांगोला निवडणूक निकाल : हेलिकॉप्टरने येऊन रातोरात भाजपमध्ये घेतलेल्या उमेदवाराचा पराभव
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रातोरात हेलिकॉप्टरने येऊन प्रवेश घेतलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं दिसून आलं. सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर यांनी यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारीही देण्यात आली होती. पण मतदारांनी त्यांचा पराभव केला.
सोलापूरच्या सांगोलामध्ये शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांची एकहाती सत्ता आली. सांगोला नगरपरिषद पदाच्या उमेदवार आनंदा माने या विजयी झाल्या आहेत. आनंदा माने या 4 हजार 775 मतांनी विजयी झाल्या. सांगोलामध्ये शिवसेनेविरोधात भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि शेकापनी युती केली होती, त्यामुळे शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर सांगोल्यात 20 पैकी 17 जागांवर विजय मिळवत शहाजीबापूंनी गड राखला.
Kankavli Election Nilesh Rane : कणकवलीत निलेश राणेंची मुसंडी
सिंधुदुर्गातील सर्वात चर्चेची आणि राणेंचा बालेकिल्ला असलेली कणकवली नगर परिषदेवर शहर विकास आघाडीचा झेंडा अखेर फडकला. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर 150 मतांनी विजय़ी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कणकवली नगरपरिषदेत भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्र येत निवडणूक लढवली गेली होती. त्यामुळे कणकवलीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला होता. अखेर संदेश पारकर विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला.
मालवण निवडणुकीचा निकाल : स्टिंग ऑपरेशन केलेल्या मालवणमध्ये शिवसेनेचा झेंडा
आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केलेल्या सिंधुदुर्गातील मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने मुसंडी मारली. शिवसेनेच्या 10 जागा विजयी तर भाजपला फक्त 5 जागा जिंकात आल्या. त्यामुळे भाजपचे मंत्री नितेश राणे यांना मालवण नगरपरिषदेत धक्का बसला आहे. मालवणच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या. निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी छापेमारी करत 25 लाखांची रोकड पकडून दिली होती.
सावंतवाडी निवडणुकीचा निकाल : मराठीवरुन ट्रोल झालेल्या श्रद्धाराजे भोसले विजयी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले या त्यांच्या मराठी बोलण्यावरुन ट्रोल झाल्या होत्या. त्या 1374 मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांना मोठा धक्का बसला आहे.
सातारा निवडणुकीचा निकाल : साताऱ्यात दोन्ही राजांना धक्का
प्रभाग क्रमांक 1 मध्ये शंकर किर्दत आणि प्रभाग 3 मधून मयूर कांबळे, शकुंतला जाधव या अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. हा दोन्ही राजांसाठी धक्का असल्याचं मानलं जातंय.
भगूर निवडणुकीचा निकाल : भगूरमध्ये शिंदेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
भगूर नगरपरिषदेमध्ये अजित पवार–भाजप युतीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
मालेगाव निवडणुकीचा निकाल : माळेगावात ईश्वर चिठ्ठीतून अपक्ष विजयी
माळेगाव नगर पंचायत भाजप राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून अजित पवारांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला आहे. माळेगावामध्ये राष्ट्रवादी-भाजपने 17 पैकी 10 ठिकाणी विजय मिळवला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून विजय झाला आहे. गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.
भद्रावती निवडणुकीचा निकाल : चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवारा एका मताने विजयी
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परषदेमध्ये भाजपच्या उमेदवार वृषाली विनोद पांढरे यांचा केवळ एका मताने विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
आणखी वाचा
Comments are closed.