महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; साहेबांकडून धनादेश, काका पवारांनाही गिफ्ट
पुणे : कुस्ती शौकिनाचं शहर असलेल्या पुण्यातील (Pune) वाघोली येथे नुकतेच संपन्न झालेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजता, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान राजकीय वस्तादाला भेटल्याची चर्चा यावेळी रंगली. हर्षवर्धनने शरद पवारांचे आशीर्वाद घेतल्यानंतर महाराष्ट्र केसरी विजयाची मानाची चांदीची गदा शरद पवार यांच्या हाती देत फोटो काढले. तर, खासदार शरद पवार यांनी हर्षवर्धन सदगीरला 12 लाख रूपयांची शिष्यवृत्ती तर काका पवार यांच्या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल या तालमीसाठी 50 लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. त्यापैकी २५ लाखांचा पहिला हप्ता काका पवार यांच्या सुपूर्द करण्यात आला.
हर्षवर्धन सदगीर आणि अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांनी शरद पवार यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. यावेळी उद्योजक मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्यावेळी येत्या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे काका पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, हर्षवर्धनने दोनच महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर मनातील खंत बोलून दाखवली होती. मी नाशिक येथे मंत्री दादा भुसेंना भेटलो, एकनाथ शिंदेंनाही भेटलो होतो. पण, मला सरकारी नोकरी मिळाली नाही, आता मला नोकरीची गरज नाही असेही त्याने म्हटले होते.
हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्पिकपटू होण्यासाठी पुढील 2 वर्षांसाठी महिना 50 हजार प्रमाणे 12 लाखांच्या शिष्यवृत्तीचा धनादेशही शरद पवार यांच्याकडून देण्यात आला. काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह 11 मल्लांनी पदकाची लयलूट केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला 50 लाख रूपयांचं आर्थिक सहाय्य शरद पवार यांनी दिलं आहे.
सुनेत्रा पवारांचीही घेतली भेट
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही कालच ट्विट करुन हर्षवर्धन सदगीरच्या भेटीची माहिती देत शुभेच्छा दिल्या होत्या. महाराष्ट्र केसरी 2026 चे विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे ट्विट सुनेत्रा पवार यांनी केले होते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.