MI vs CSK सामन्यानंतर आयपीएलमध्ये नवा वाद पेटला; मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप, शेवटी कोचला यावं
MI vs CSK IPL 2026 Concussion substitute विवाद : आयपीएल 19व्या हंगामात एक नवा वाद चांगलाच पेटला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ‘कनकशन सबस्टिट्यूट’ नियमाच्या वापरावरून मुंबई इंडियन्सवर नियमांचा गैरवापर केल्याचे आरोप झाले आहेत. नेमकं काय घडलं आणि हा नियम नेमका काय आहे, हे जाणून घेऊया.
नेमकं काय घडलं? (Shardul Thakur Concussion Substitute For Mitchell Santner)
चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी सुरू असताना 17व्या षटकात मिचेल सँटनरने एक झेल घेताना जोरात पडला. पडताना त्याचा खांदा आधी जमिनीवर आपटला आणि त्यानंतर त्याचं डोकंही जमिनीला लागल्याचं रिप्लेमध्ये दिसलं. त्यानंतर सॅन्टनरला वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर जावं लागलं आणि तो पुन्हा मैदानात उतरला नाही. मुंबईच्या डावात मिचेल सँटनरच्या जागी ‘कनकशन सबस्टिट्यूट’ म्हणून शार्दुल ठाकूरला खेळवण्यात आलं. विशेष म्हणजे, याआधीच मुंबईने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा वापर केला होता.
वाद का निर्माण झाला?
वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा सॅन्टनर ड्रेसिंग रूममध्ये खांद्याला स्लिंग बांधून दिसला. ‘कनकशन’ हा नियम डोक्याला झालेल्या दुखापतीसाठी लागू होतो. मात्र सॅन्टनरला मुख्य दुखापत खांद्याला झाल्याचं दिसत असताना, त्याच्या जागी कनकशन सबस्टिट्यूट कसा घेतला, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित झाला. आयपीएलच्या नियमांनुसार, सामन्यापूर्वीच संघांना कनकशन सबस्टिट्यूटचे पर्याय (बॅटर, बॉलर, ऑलराउंडर) द्यावे लागतात. अंतिम निर्णय सामना रेफरीकडे असतो, जो ‘like-for-like’ म्हणजेच समान भूमिकेचा खेळाडू उतरवण्याची खात्री करतो.
शेवटी कोचला यावं लागलं समोर
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, मिचेल सँटनरला डोकं आणि मानेवरही मार बसला होता. स्कॅननंतर त्याला चक्कर येत होती, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कनकशन सबस्टिट्यूटसाठी विनंती केली आणि अंपायर व रेफरी यांनी ती मान्य केली.
सामन्याचा निकाल
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत 6 बाद 207 धावा केल्या. संजू सॅमसनने नाबाद 101 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव केवळ 104 धावांत आटोपला. मुंबईला 103 धावांनी पराभव पत्करावा लागला, जो त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. तर चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सर्वात मोठा विजय ठरला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.