निळ्या समुद्रात पिवळं वादळ; CSKच्या एका विजयाने तिघांची शिकार, पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची ‘रॉकी
MI vs CSK IPL 2026 पॉइंट टेबल अपडेट : आयपीएल 2026 हंगामात धमाकेदार पुनरागमन करत चेन्नई सुपर किंग्सने आपला प्रवास सुरूच केला आहे. सलग तीन पराभवांनी हताश सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली जबरदस्त कमबॅक करत गेल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आणि स्पर्धेतल्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या मोहिमेतील सर्वात मोठा आणि खास कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळाला. सीएसकेने मुंबईचा तब्बल 103 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. मुंबईविरुद्धचा हा चेन्नईचा सर्वात मोठा विजय ठरला असून, याच जोरावर पॉइंट्स टेबलमध्येही त्यांनी मोठी झेप घेतली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 23 एप्रिल रोजी झालेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 207 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये संजू सॅमसनने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत या हंगामातील आपले दुसरे शतक झळकावले. त्याने 101 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तर, मुंबईची फलंदाजी पूर्णपणे कोसळली आणि संपूर्ण संघ फक्त 104 धावांवर आटोपला. फिरकीपटू अकील होसेनने 4 विकेट घेत मुंबईच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा 100 पेक्षा जास्त धावांनी झालेला हा पहिलाच पराभव ठरला. (MI vs CSK IPL 2026 Points Table Update)
विक्रमी विजयामुळे सीएसकेची मोठी झेप
या विजयामुळे चेन्नईने फक्त विक्रमच नाही तर गुणतालिकेतही खळबळ उडवली. नेहमीप्रमाणे दोन गुण मिळाले असले तरी नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला. 7 सामन्यांत 6 गुणांसह सीएसके आठव्या स्थानावरून थेट पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. या झेपेत त्यांनी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांनाही मागे टाकले. या दोन्ही संघांचेही 6 गुण आहेत, मात्र सीएसकेच्या प्रचंड विजयामुळे त्यांचा नेट रनरेट अधिक मजबूत झाला आहे.
मुंबईला दुहेरी फटका
या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. सामन्यापूर्वी ते सीएसके बरोबर 4 गुणांसह सातव्या स्थानावर होते आणि नेट रनरेटच्या जोरावर वर होते. मात्र या 103 धावांच्या पराभवामुळे त्यांचा नेट रनरेट घसरून -0.736 वर आला आणि ते आठव्या स्थानावर घसरले. मुंबईच्या खाली नवव्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स तर दहाव्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्स आहेत. सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पंजाब किंग्स कायम आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.