धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही नाही
अकोला : पुण्यात 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर, विविध जिल्ह्यातील अशाच घटना समोर येत असून पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जात आहे. मात्र, अकोला शहरात एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून, पोलिसांनी (Police) तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. अकोल्यातील (Akola) मोठी उमरी भागातल्या एका 6 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच नात्यातीलच अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका आईने केलाय. लैंगिक अत्याचार करणारा मुलगा हा जवळच्या नात्यातीलच असल्याचं त्या महिलेने सांगितल.
अकोल्यातील 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात तक्रार दाखल न करण्यासाठी घरातून आणि पोलिसांकडून प्रचंड दबाव आल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केलाय. यासंदर्भात पीडित चिमुकलीच्या आईने 5 मे रोजी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात तक्रार दाखल केलीय. मात्र, सिव्हिल लाईन पोलीस कोणतीही दाद देत नसल्याने पीडित चिमुकलीच्या आईने अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेतली. मात्र, त्यांनीही तक्रारदार महिलेला परत सिव्हिल लाईन पोलिसांकडे पाठविल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला. यासंदर्भात तक्रार न दाखल करण्यासंदर्भात सिव्हिल लाईन पोलीस आणि काही राजकीय व्यक्तींकडून दबाव येत असल्याचं तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात कोणतीच तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नसल्यामुळे सदर चिमुकलीची वैद्यकीय तपासणीही अद्याप करण्यात आलेली नाही. यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मालती कायटे यांच्याशी संवाद साधलाय. त्यांनी यासंदर्भात ‘इन कॅमेरा’ काहीही बोलायला नकार दिलाय. मात्र, आपण मुलीच्या आईची तक्रार दाखल करुन घेण्यास तयार आहोत; मात्र, तिने नंतर संपर्क केला नसल्याचं कायटे यांनी एबीपी ‘माझा’शी बोलताना म्हटलं. तर, सिव्हिल लाईन पोलिसांनी दाद न दिल्यामुळेच पोलीस अधीक्षकांकडे न्याय मागावा लागल्याचे तक्रारदार महिलेने म्हटलं आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, एवढ्या गंभीर प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी पाच दिवसांपासून अक्षम्य दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केलाय का?, असा प्रश्न यातून आता उपस्थित होतांना दिसतोय.
पोलिसांवर कोणाचा दबाव?
राज्यभरात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरुन संताप व्यक्त होत असताना पोलिसांकडून बेजबाबदार आणि हलगर्जीपणा का केला जातोय, पोलीस नेमकं कोणत्या दबावाखाली आहेत, आता गृहमंत्री याकडे लक्ष देतील का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
हेही वाचा
मायलेकी एकाचवेळी पास; मुलीसोबत आईचीही 10 वी; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?
आणखी वाचा
Comments are closed.