नाशिकमध्ये मोबाईलवरुन पत्नीला ‘ट्रिपल तलाक’; पती म्हणाला, ‘आज से तू हलाल नही, हराम हो गई’, गुन्

नाशिक क्राईम न्यूज : देशात ‘तिहेरी तलाक’ (Triple Talaq) ही प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवण्यात आली असतानाही, नाशिक (Nashik) शहरात या प्रथेचा जाच अद्यापही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून, तिला अमानुष मारहाण करत गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या एका संशयित पतीविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News: नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मलिक अशरफ समशेर (28, रा. अल्फाद रेसिडेन्सी, पखाल रोड) हा दिंडोरीतील जऊळके येथे भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने पीडितेशी फेब्रुवारी 2022 मध्ये रीतसर नोंदणी (रजिस्टर) पद्धतीने विवाह केला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू असताना, समशेरने शुल्लक कारणावरून पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली.

Nashik Crime News: मारहाणीत बाळाचा मृत्यू अन् फोनवर तलाक

जानेवारी 2025 मध्ये संशयिताने पीडितेला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा फटका इतका गंभीर होता की, पीडितेच्या पोटातील वाढणाऱ्या भ्रूणाचा मृत्यू झाला. यानंतर 30 जानेवारी 2026 रोजी मलिकने पीडितेच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी त्याने अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, “आज से तू हलाल नही हराम हो गई… मैं होश ओ हवास में बोल रहा हूं, तलाक, तलाक, तलाक” असे म्हणत बेकायदेशीररीत्या काडीमोड दिला. इतकेच नाही तर हा संवाद रेकॉर्ड केल्याची धमकीही त्याने पीडितेला दिली.

Nashik Crime News: पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीने कारवाई

पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर शुक्रवारी (दि. 8 मे) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली. आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई नाका पोलिसांना दिले. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण) कायदा 2019 च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?

Jalgaon Crime News: पुण्यातील नांदेड सिटीत सुनेला संपवलं, नंतर घराला कुलूप लावून सासरा पसार; जळगाव पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

आणखी वाचा

Comments are closed.