‘उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस…; बाळ मानेंच्या ‘त्या’ खेळीवर विनायक राऊतांच
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 मुंबई: कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची (Konkan Vidhan Parishad Election 2026) निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने (Bal Mane) अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात काल आपला अर्ज मागे घेतला. यावेळी बाळ मानेंसोबत भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) उपस्थित होते. त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळाला. बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊतांनी बाळ मानेंचा गद्दार असा उल्लेख केला. त्याचबरोबर पैसे घेऊन उमेदवारी मागे घेतल्याचाही आरोप त्यांच्यावरती केला जात आहे, या सगळ्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं.
Vinayak Raut On Bal Mane : फडणवीसांचं म्हणजे आणखी खायला मोकळे…
तर बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, या सगळ्यानंतर काही आरोप त्यांनी कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर केले. त्याचसोबत त्यांनी हेही सांगितलं की यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकणार यावरती ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, ऐका आता फडणवीसांचं म्हणजे आणखी खायला मोकळे.
Vinayak Raut On Bal Mane : माझ्या समोरच्या उमेदवाराकडून गोव्यामधून त्यांनी पैसे घेतले
विनायक राऊतांच्या काही कोटी रुपये घेऊन अर्ज मागे घेतला या आरोपावर बाळ माने सांगतात की, विनायक राऊतांनाच मी शिवसेनेमध्ये नको होतो, त्यावर विनायक राऊत म्हणाले बाळ माने यांची कार्यपद्धती आम्हाला पूर्वीपासून माहिती आहे. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या समोरच्या उमेदवाराकडून गोव्यामधून त्यांनी पैसे घेतले होते, ज्या पक्षांमध्ये जाईल त्या पक्षांमध्ये राहून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचे काम करणं हेच बाळ माने यांचं वैशिष्ट्य आहे
Vinayak Raut On Bal Mane : तरीसुद्धा हा माणूस भेटायला गेला नाही
तर अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने म्हणाले, मी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. महायुतीचा दबाव होता. मात्र कुठलाही प्रतिसाद नेत्यांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून आला नाही. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. यावर विनायक राऊत म्हणाले, चोराच्या उलट्या बोंबा आहेत, खास करून मी उद्धव ठाकरे यांना भेटायला येतोय, पुष्पगुच्छ घेतोय, आता गाडीत बसतो, आता मी आता हॉस्पिटलमध्ये आहे, पुढच्या पाच मिनिटात मी उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला येतो आहे, असं ते सांगत होते, ही परवाच्या दिवशीची घटना आहे. मुंबईमध्ये ते आले होते, बाळ माने भेटायला येत आहेत म्हणून स्वतः उद्धव ठाकरे जवळजवळ दोन अडीच वाजेपर्यंत खाली थांबून होते, मातोश्रीवर थांबले होते, तरीसुद्धा हा माणूस भेटायला गेला नाही, ही थापेबाजी करणे हा खरा धंदा बाळा मानेंचा आहे.
Vinayak Raut On Bal Mane : सर्व मतदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या
आधीच ते महायुती जाणारी ठरलं होतं का? या प्रश्नावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, शंभर टक्के त्याने तशा पद्धतीचा एक कपटकारस्थान पंधरा दिवसांपूर्वीपासूनच ठरवलं होतं, ज्यावेळेला ही निवडणूक जाहीर झाली. त्या वेळेला त्याने निवडणुकीचे नॉमिनेशन फॉर्म घेतले आणि या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे मतदार आहेत, त्या सर्व मतदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या, जेणेकरून जो दुसरा कोण उमेदवार डमी द्यायचा झाला तर त्याला ती संधी मिळू नये म्हणून, शंभर टक्के उमेदवारांच्या सह्या याने घेऊन ठेवल्या, शिवसेना ठाकरे गटाचे जे मतदार होते, त्या सगळ्या मतदारांच्या त्याने सह्या घेतल्या, जर आम्हाला कुठला डमी उमेदवार द्यायचा असेल तर त्यांना सूचकाच्या सह्या मिळू नये, यासाठी या पद्धतीचे षडयंत्र त्याने अत्यंत शांतपणे रचलं. आता ते सगळीकडून माहिती पडतंय. सगळ्यांच्या नाही तर फक्त दहा जणांच्या सह्या हव्या होत्या, चार फॉर्म भरले असते तर 40 जणांच्या सह्या, पण चार फार्म भरायची गरजच नव्हती, परंतु जाणून-बुजून दुसऱ्या कोणाला संधी मिळू नये म्हणून सगळ्यांच्या सह्या घेतल्या.
Vinayak Raut On Bal Mane : फक्त न फक्त आल्यानंतर विधानसभा मिळवली
बाळ माने म्हणत होते की विनायक राऊत प्रत्येक वेळी मला विरोध करतात, त्यावर विनायक राऊत म्हणाले, बाळ माने यांच्या विरोधात असण्याचं कारण नाही, पण त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात मी होतो, बाळ माने यांनी शिवसेनेमध्ये येत असताना एकही भाजपचा कार्यकर्ता सोबत आणला नाही. फक्त न फक्त आल्यानंतर विधानसभा मिळवली, त्यानंतर आत्तासुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घरामध्ये उमेदवारी घेतली, तिथे जर आम्ही दुसरा एक सक्षम उमेदवाराला आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असती, तर 1001% महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला असता पण, याने उद्धव साहेबांना फसवलं आणि स्वतःच्या घरातली उमेदवारी दिली आणि नामुष्की ओढवून घ्यावी लागली.
Vinayak Raut On Bal Mane : आम्ही ते शिवसेनेच्या निधीमध्ये जमा करू
तुम्ही जे बाळ माने यांच्यावर आरोप केले पैसे घेतले. त्यावरून ते तुमच्यावर आरोप करतात की, कार्यकर्त्यांना पत्र देण्यासाठी पैसे घेतले जातात पालघर लोकसभेच्या वेळेस हॉटेलमध्ये विनायक राऊत यांंनी किती पैसे घेतले ते सांगावं, यावर विनायक राऊत म्हणाले जर मी पैसे घेतले तुला माहिती असेल तर मला आणून दे आणि ज्याने कोणी दिले त्याच्यातले 50% अजून तू घे, शिल्लक राहिलेले 50% आम्हाला आणून दे, आम्ही ते शिवसेनेच्या निधीमध्ये जमा करू, त्यामुळे शिवसेना पक्षासोबत बेईमानी करणारी विनायक राऊतांची अवलाद नाही, ती अवलाद बाळ माने यांची अवलाद आहे. भारतीय जनता पक्षाची बेईमानी केली. शिवसेनेमध्ये आले. शिवसेना पक्षाची बेईमानी केली, भाजप, तटकरेंच्या नादी लागले, तटकरेंशी बेईमानी केली, नितेश राणे यांच्या नादी लागले, आता देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागणार आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेला स्वार्थासाठी आपला वेगवेगळ्या डबकं शोधणारी अवलाद म्हणजे बाळ माने अशा शब्दात विनायक राऊतांनी बाळ मानेंवर हल्लाबोल केला आहे.
Vinayak Raut On Bal Mane : 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा आहे
घोडा बाजार होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे, कारण पैसे वाटप केले जाणार होते आणि ते सगळं बघता मी स्वतःचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, मग आमच्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांकडे बसून त्यांना हे पटवून का दिले नाही, त्यांनी का नाही त्यांना सांगितलं, आता येतोय, पाच मिनिटात येतोय, पाच मिनिटात पोहोचतोय, करून ते दोन दिवस मातोश्रीवर आलेच नाहीत. आत्ता जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे, त्या अगदी 20 चा आकडा बाहेर पडतोय. 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा आहे, 20 कोटी रुपयांचा बकरा, अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे. देवगडमध्ये आहे, लोकांना माहिती आहे त म्हणजे ताक भात ते, असंही विनायक राऊत म्हणालेत.
Vinayak Raut On Bal Mane : प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये शंका तर होतीच
महायुतीकडून अशी काही फिल्डिंग लावली होती का? याची कुणकुण होती का? या प्रश्नावर उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, शक्यतो तेवढी कुणकुण नव्हती, परंतु रत्नागिरीतला प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला विचारायचं की, यांना उमेदवारी दिल्यानंतर हे टिकणार का? माघार घेणार नाहीत ना? प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये शंका तर होतीच, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा बाळ माने यांना उमेदवारी द्यायला रत्नागिरी मधून माझा विरोध होता, कारण माझं ठाम मत होतं मी उद्धव साहेबांना विनंती केली होती की, त्या वेळेला बाळ माने पेक्षा दुसऱ्यांना उमेदवारी द्या हे मी सांगितलं होतं, परंतु त्यावेळेला लबाडाने, वाचाळवीराने साहेबांना भूरळ घातली आणि त्याने उमेदवारी मिळवली.
Comments are closed.