झ्वेरेव ग्रॅण्ड जेतेपदासमीप, चौथ्यांदा गाठली ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अनेकदा अंतिम टप्प्यावर येऊनही जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवचे हुकलेले ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न यंदा अखेर साकार होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे. त्याने झेक प्रजासत्ताकच्या याकूब मेन्सिकचे आव्हान 7-5, 6-2,3-6, 6-3 असे परतवून लावत कारकीर्दीतील चौथ्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दुसऱयांदा लाल मातीतल्या अंतिम लढतीत स्थान मिळवले. म्हणजेच झ्वेरेव पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदापासून अवघा एक विजय दूर आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी झ्वेरेव ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या इतक्या जवळ पोहोचेल, असे कदाचित त्यालाही वाटले नसेल. मात्र प्रत्येक सामन्यागणिक त्याने आपली दावेदारी अधिक मजबूत केली आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने जोरदार स्मॅशेस मारत अंतिम फेरी गाठली. या लढतीत मेन्सिकने त्याला चांगलीच लढत दिली. पहिला सेट 5-5 असा बरोबरीत असताना झ्वेरेव्हने 7-5 आघाडीसह पहिला सेट जिंकला. दुसऱया सेटमध्ये झ्वेरेवने 6-2 असे आपले वर्चस्व दाखवले. मात्र तिसऱया सेटमध्ये मेन्सिकने जोरदार पुनरागमन करत सामन्यात जान आणली. मात्र चौथ्या सेटमध्ये झ्वेरेवने आपल्या वेगवान खेळाचे दर्शन घडवत सेट जिंकला आणि सामनाही खिशात घातला.

मेन्सिकची ही पहिलीच ग्रॅण्डस्लॅम उपांत्य फेरी होती तर झ्वेरेव चौथ्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर. पण याक्षणी अनुभव जिंकला. दुसऱया सेटनंतर मानेच्या दुखापतीमुळे मेडिकल टाइमआऊट घेतल्यानंतर मेन्सिक पुन्हा मैदानात उतरला आणि त्याने तिसरा सेट जिंकून चांगलीच चमक दाखवली होती. पण चौथ्या सेटमध्ये झ्वेरेवने त्याची लय तोडली.

Comments are closed.