गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद आता ‘सागर’ बंगल्यावर, म्हात्रेंनी घेतली फडणवीसांची भेट, राष

मुंबई : नवी मुंबईतील भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवीन रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून आणि मुख्यमंत्र्यांचे नाव वगळल्यावरून हा वाद पेटला आहे, तर म्हात्रेंनी नाईकांच्या कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा आरोप करत थेट नाईक यांच्या त्रासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका आरोग्य सुविधेच्या उद्घाटन कार्यक्रमात, स्थानिक पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवरून वगळण्यात आल्यामुळे हा वाद सुरू झाला, यावरतीही मंदा म्हात्रे यांनी यावर आक्षेप घेत, हा शिंदे आणि स्थानिक आमदारांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) विरुद्ध मंदा म्हात्रे वादाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील भाजपचा अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत गेला आहे, आज मंदा म्हात्रेंनी फडणवीसांची भेट घेतली, भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंदा म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Ganesh Naik)

“मला त्रास देण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. कालच्या कार्यक्रमात मी गेले होते, पण तिथे भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या सगळ्या नगरसेवकांनी मला धक्काबुक्की केली. तिथे अक्षरशः उभे राहायलाही जागा कमी पडत होती. त्यामुळे पहिल्या कार्यक्रमात मी फीत कापताना उपस्थित होते, मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या कार्यक्रमातून मी निघून गेले,” असा गंभीर आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. कार्यक्रमातील गैरवर्तणुकीवर आणि अंतर्गत राजकीय वादावर बोलताना मंदा म्हात्रे यांनी थेट गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला.

Manda Mhatre : “म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती…”

मंदा म्हात्रे म्हणाल्या, “हा त्रास आजचाच आहे का? मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला? याच त्रासामुळे ना! मला काय शरद पवार साहेब किंवा अजित दादा आवडत नव्हते का? मी त्यांच्यासोबत १७ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची पहिली महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पक्ष उभा केला. पण जेव्हा हे (गणेश नाईक) शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले, तेव्हापासून माझ्यावर अन्याय सुरू झाला. त्यामुळे मला तो पक्ष सोडावा लागला.”

Manda Mhatre : देवेंद्र फडणवीस यांनी दिला आधार

“राष्ट्रवादीतील अन्यायाला कंटाळून २०१४ मध्ये मी ‘देवाभाऊंना’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले. ते म्हणाले की, तिथे एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा तुम्ही इकडे (भाजपमध्ये) या. मी भाजपमध्ये आले, पण दुर्दैवाने माझ्या पाठीमागे हे पुन्हा इथेही आले. आता इथेही तीच ‘परीकथा’ आणि तोच त्रास पुन्हा सुरू झाला आहे. कार्यक्रमात धक्काबुक्की करायची जेणेकरून मी तिथून पळून जाईन, हे त्यांचे आधीपासूनच ठरलेले असते. या प्लॅनिंगची आणि त्यांच्या लोकांच्या वागणुकीची वरिष्ठ नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.”

Manda Mhatre :  “भाजपमध्ये आले नसते तर आमदार-मंत्री झाले असते का?”

गणेश नाईक यांच्यावर थेट निशाणा साधत म्हात्रे म्हणाल्या, “ते काल म्हणत होते की, मी कोणाकडे भीक मागत नाही, कष्टाने मिळवले पाहिजे. अहो, तुम्ही कुठून कुठून जॅक (वजन) लावले म्हणून आज मंत्री झाले आहात! जर तुम्ही भारतीय जनता पार्टीत आले नसते, तर आमदार आणि मंत्री तरी झाले असते का? भाजपमध्ये तुमच्या आधीपासून मी आलेली आहे. काय बोलायचे आणि काय करायचे, ही त्यांची जुनी सवय आहे. त्यांनी कुठून जॅक लावला, हे संपूर्ण महाराष्ट्राला चांगलेच माहिती आहे.”

Manda Mhatre :  “माझा पक्षावर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास”

माझ्यावर अन्याय होत नाही, असे स्पष्ट करत म्हात्रे पुढे म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच पक्षाने मला २०१४, २०१९ आणि आताही तिकीट दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये राहून त्यांनी ‘तुतारी’चा (शरद पवार गट) प्रचार केला, हे पक्षाला चांगलेच ठाऊक आहे. नवी मुंबईत भाजपचा झेंडा एकनिष्ठेने हाती घेणारी एकमेव व्यक्ती मंदा म्हात्रे आहे, हे माननीय मुख्यमंत्र्यांना, प्रदेशाध्यक्षांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. इथे खऱ्या अर्थाने भाजपसाठी कोण काम करतंय, हे मी स्वतः सांगण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः याची माहिती घेऊ शकता.”

हेदेखील वाचा

Comments are closed.