तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी..

सोलापूर: पंढरपूर शहरातील (Solapur) रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून धक्कादायक म्हणजे या मृतदेहाचा पाय  संबंधित तरुणाच्या मावशीच्या घरावर लटकवण्यात आला होता. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी या मृत्यूला आत्महत्या ठरवत आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या (Police) या भूमिकेमुळे या मृत्यूमागचे गुढ वाढले आहे. एका बाजूला तरुणाचे कुटुंबीय आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप करीत असून पोलिसांच्या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. कारण, मृत युवकाच्या आईने गंभीर आरोप करत, माझ्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वेसमोर टाकल्याचं म्हटलं आहे.

पंढरपुरातील तरुणाच्या मृ्त्यूची ही घटना पोलिसांनी आत्महत्येचा प्रकार असल्याचं म्हटलं, रेल्वेचे इंजिन ड्रायव्हरने घटनेनंतर लगेचच रेल्वे समोर एकाने उडी  मारल्याची नोंद रेल्वे कंट्रोलला दिली होती, तसा त्याचा जबाब पोलिसांकडे असल्याचा दावाही पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केला आहे. त्यामुळे, पोलीस ठाण्यात रोहितचा आकस्मित मृत्यू अशी नोंद केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर, रेल्वेच्या धडकेनंतर मृत रोहितच्या शरीराचे जे तुकडे झाले होते, त्यातील एक तुकडा तिथून शंभर मीटरवर असणाऱ्या घरावर लावलेला आढळला. त्यासाठी, मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरल्याचेही पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सांगत आहेत. या सर्व गोष्टीचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रोहितला आधी मारलं, नंतर रेल्वेसमोर फेकलं

रोहितचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले, तरी मृताचे कुटुंबीय हे मानायला तयार नसून आपल्या मुलाची काही लोकांसोबत तक्रार झाल्यानंतर त्याला आधी मारण्यात आले व नंतर रेल्वे समोर टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबाकडून होत आहे. माझा एकुलता एक मुलगा गेला असून मला न्याय पाहिजे, अशी विनवणी रोहितची आई करीत आहे. या कुटुंबाकडून आपल्या मुलाचा घात केल्याप्रकरणी काही संशयित लोकांची नावेही सांगितली जात आहेत. एका बाजूला मुलाच्या मृत्यूबाबत कुटुंब एवढे ठामपणे प्रश्न उपस्थित करीत असताना पोलिसांनी पुन्हा एकदा या सर्व प्रकाराचा तपास केल्यास रोहित याचा मृत्यू आत्महत्या की घातपात हे समोर येईल. तसेच, रोहितच्या मृतदेहातील पाय रेल्वे रुळावरुन त्याच्या मावशीच्या घरावर कसा आला? याचेही कोडं उलघडेल. रोहितच्या कुटुंबीयांची ती मागणी आणि आर्त हाक आहे.

हेही वाचा

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही

Comments are closed.