पोलिसांची एक घोडचूक, पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले, ओमराजे निंबाळकरांना जबर धक्का, 20 वर्षांची ल
पवनराजे निंबाळकर प्रकरण: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Case) अखेर 20 वर्षांनंतर निकाल लागला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने (CBI Special Court) माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Dr. Padmasinha Patil) यांच्यासह सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
या खटल्याचा पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. तपासातील गंभीर त्रुटी, पुराव्यांतील विसंगती आणि पोलिसांच्या काही मूलभूत चुका यामुळे सरकारी पक्षाचा संपूर्ण खटला कोसळल्याचे न्यायालयाने म्हटले.
Pawanraje Nimbalkar Case: न्यायमूर्तींचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी निकालवाचन करताना म्हटले की, “20 वर्षांनंतर हा निकाल देताना न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एका लोकनेत्याची भरदिवसा गोळीबार करून हत्या झाली. सुरुवातीला कळंबोली पोलीस, त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखा आणि नंतर सीबीआयकडे तपास गेला. या खटल्यात तब्बल 127 साक्षीदार तपासण्यात आले.” न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही आरोपीला केवळ संशयावरून दोषी ठरवता येत नाही. दोषारोप सिद्ध करण्यासाठी ठोस आणि विश्वासार्ह पुरावे आवश्यक असतात.
Pawanraje Nimbalkar Case: माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याला धक्का
या प्रकरणातील माफीचा साक्षीदार पारसमल जैन याची साक्ष हा संपूर्ण खटल्याचा मुख्य आधार होता. मात्र न्यायालयाने त्याच्या जबाबांमधील विसंगतींचा सविस्तर उल्लेख केला. न्यायालयाने नमूद केले की, जैन याला 8 सप्टेंबर 2009 रोजी ताब्यात घेतल्याचा दावा आहे, मात्र अधिकृत अटक 25 सप्टेंबरला दाखवण्यात आली. या कालावधीत त्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आले, मारहाण झाली, औषधे बंद करण्यात आली आणि दबावाखाली कबुलीजबाब घेतल्याचे आरोप त्याने केले. न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्षाने या गंभीर बाबींची पुरेशी माहिती न्यायालयासमोर ठेवली नाही. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात कमी झाली.
Pawanraje Nimbalkar Case: पोलिसांची एक घोडचूक
तपासातील सर्वात गंभीर त्रुटीवर भाष्य करताना न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, “या प्रकरणात कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला नाही. कॉल डिटेल रेकॉर्ड गोळा करण्यात आले नाहीत. आरोपी परस्पर संपर्कात होते का, याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांकडे नाही.” न्यायालयाने पुढे नमूद केले की, जर मोबाईल डेटा आणि सीडीआर सादर करण्यात आले असते, तर आरोपींमधील कथित कट किंवा संपर्क सिद्ध करण्यास मदत झाली असती. मात्र पोलिसांच्या या घोडचुकीमुळे तपासातील एक महत्त्वाचा दुवा कायमचा हरवला.
Pawanraje Nimbalkar Case: चार वेळा वेगळ्या कहाण्या
माफीच्या साक्षीदाराने हत्येच्या दिवशी आपण कुठे होतो याबाबत वेगवेगळ्या वेळेला चार भिन्न माहिती दिल्याचे न्यायालयाने नमूद केले. कधी तो थेट श्रीनाथजीला गेल्याचे सांगतो, कधी अहमदाबादला गेल्याचे, कधी मित्राकडे राहिल्याचे तर कधी नाथद्वारा मार्गे प्रवास केल्याचे सांगतो. या परस्परविरोधी कथनांमुळे त्याच्या संपूर्ण साक्षीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले की, “प्रत्येक वेळी वेगळी कथा सांगणाऱ्या साक्षीदारावर विश्वास ठेवणे शक्य नाही.”
Pawanraje Nimbalkar Case: गाडीच्या रंगापासून घटनास्थळापर्यंत तफावत
न्यायालयाने तपासातील इतर त्रुटींचाही उल्लेख केला. गुन्ह्यात वापरलेली गाडी पूर्णपणे जळून गेली असताना जप्ती पंचनाम्यात तिचा रंग हिरवा असल्याची नोंद करण्यात आली होती. तसेच गाडी नेमकी कुठे उभी होती याबाबतही साक्षीदार, पंचनामे आणि पोलिस नोंदी यामध्ये परस्परविरोधी माहिती आढळली. या सर्व तफावतींमुळे सरकारी पक्षाच्या कथनावर संशय निर्माण झाल्याचे न्यायालयाने म्हटले.
Pawanraje Nimbalkar Case: राजकीय वैमनस्य मान्य, पण पुरावे अपुरे
न्यायालयाने मान्य केले की, 2002 नंतर पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय संघर्ष वाढला होता. तेरणा साखर कारखाना, निवडणुका आणि स्थानिक राजकारणामुळे दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. पवनराजे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र केवळ वैमनस्य असल्यामुळे आरोपींना दोषी ठरवता येत नाही. त्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का
या निकालामुळे पवनराजे निंबाळकर यांच्या कुटुंबीयांना आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतरही कोणालाही शिक्षा झाली नाही. न्यायालयाने तपासातील गंभीर त्रुटी आणि अपुऱ्या पुराव्यांमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिलेल्या राजकीय हत्याकांडांपैकी एक असलेल्या या प्रकरणाचा शेवट आरोपींच्या निर्दोष मुक्ततेने झाला आहे.
Pawanraje Nimbalkar Case: मुक्त झालेल्या आरोपींची यादी
१. डॉ. पद्मसिंह पाटील (86 वर्षे)
2. सतीश मांदाडे
3. मोहन शुक्ला
४. शशिकांत कुलकर्णी
5. कैलास यादव
6. दिनेश तिवारी
७. पिंटू सिंग (मुख्य शूटर)
8. छोटे पांडे
Pawanraje Nimbalkar Case: नेमकं प्रकरण काय होतं?
3 जून 2006 रोजी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत एक्सप्रेस हायवेवर पवनराजे निंबाळकर यांची कार अडवून अंदाधुंद गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी याचाही मृत्यू झाला होता. सीबीआयने या प्रकरणात 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवला होता. मात्र, तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आज सीबीआय कोर्टाने सर्व 8 आरोपींची निर्दोष सुटका केल्याने या प्रकरणाला अत्यंत अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे.
आणखी वाचा
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.