बीडमधील हत्येचा मुद्दा विधानसभेत; मुंडे-बंधु भगिनींकडून सखोल तपासाची मागणी, पूर्वनियोजित कट

बीड : जिल्ह्यातील पिंजऱ्यात (बीड) झालेल्या हत्याप्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात पाहायला मिळाले. परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी विधानसभेत या हत्याप्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. तर, मंत्री पकंजा मुंडे यांनीही, विलास घुले या तरूणाच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक नवनती कॉवत यांना पोलिसांनी कसल्याही दडपणाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

केज तालुक्यात 20 जूनच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला. मात्र, सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळे-मुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून आश्वासन

विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण आपले प्राण गमवावे लागले, याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिला आहे. दुसरीकडे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असुन केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, पोलिस ठाणे व अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी कट रचून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तर दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गुन्हा घडलेला असून, पोलिस प्रशासनाने सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींना अटक करावी, याबाबत केज पोलिसांना निर्देश दिले जावेत, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन – पंकजा मुंडे

ना. पंकजा मुंडे यांनी देखील या घटनेबाबत पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी विस्तृत चर्चा करून माहिती घेतली आहे. या घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या माहितीनुसार भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारणं, इतकं की त्याचा मृत्यू व्हावा हे अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेत विलास घुले या तरूणाला काहीही संबंध नसताना हकनाक मृत्यू स्वीकारावा लागला आहे. हे सर्व अस्वस्थ करणारं आहे. यासंदर्भात मी एसपी कावत यांच्याशी सविस्तर बोलले आहे, त्यांनी योग्य तपास करावा. मृत तरुणाच्या परिवाराने ही विश्वास दाखवून सहयोग करावा. त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करावे.तेच योग्य आहे. मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेन. योग्य न्यायासाठी आम्ही पाठिशी आहोत असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.

Comments are closed.