संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार?
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा (Dharmendra Pradhan Resignation) द्यावा लागला आहे. नवी दिल्लीत घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनाही प्रचंड वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. या घडामोडींवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. फडणवीस हे उच्चशिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्रामध्ये नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, आता त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांना स्वतःला राजीनामा द्यावा लागेल अशी भीती होती, त्यामुळे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, असा दावा संजय राऊतांनी केला.
देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊत : 'रझाकारांना दिल्लीत जावे लागेल'
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय बॉस दिल्लीत बसले आहेत, त्यामुळे त्यांना आदेश मानण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल. एकनाथ शिंदेसुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ‘निझाम’ दिल्लीत बसले आहेत, त्यामुळे त्यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी या ‘रझाकारांना’ दिल्ली वारी करावीच लागते, असा घणाघात त्यांनी केला.
Gen Z Protest Delhi : ‘मृतप्राय लोकशाहीला जीवदान’
दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनाला परदेशातून आर्थिक पुरवठा होत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. हे आंदोलन चिरडून टाकू असा सरकारचा अविर्भाव होता. मात्र, तब्बल 12 वर्षांनंतर देशात असे एक ऐतिहासिक आंदोलन उभे राहिले, ज्याच्या दबावामुळे मोदी सरकारमधील पहिल्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. या देशातील मृतप्राय झालेल्या लोकशाहीला जीवदान देण्याचे काम आजच्या तरुणांनी केले आहे, अशा शब्दांत राऊत यांनी आंदोलकांचे अभिनंदन केले.
Thackeray Brothers Mumbai Morcha : उद्या शिवतीर्थावर जमणार; कार्यक्रमात बदल नाही
नवी दिल्ली आणि पाटण्यासह देशभरात या प्रकरणी तीव्र आंदोलने झाली. यासाठी अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांचा लाठीचार्ज सहन करावा लागला, आपली हाडे मोडून घ्यावी लागली आणि रक्त सांडावे लागले. उद्या मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघणार होता. सरकारचा निर्णय झाला असला तरी आमच्या कार्यक्रमात बदल झालेला नाही, उद्या सर्वजण शिवतीर्थावर जमणार असून या मोर्चाचे रूपांतर कशात करायचे, याची माहिती लवकरच दिली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
ही बातमी वाचा:
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Comments are closed.