नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही परखड सवाल

ठाणे : जिल्ह्यातील डोंबिवली येथे शिवसेना नगरसेवकाने डॉक्टरांसह महिला डॉक्टरला (Doctor) केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयाने आज आरोपीला चांगलच सुनावलं. तसेच, आरोपीच्या वकिलांनाही सवाल केले. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक आरोपी रमेश म्हात्रे यांच्या जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Highcourt) सुनावणी पार पडली. यावेळी, मी तपास पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातूनच काय, पण राज्यातूनही बाहेर जायला तयार आहे. मात्र, मला कारागृहातून बाहेर काढा, अशी विनवणी रमेश म्हात्रेने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. तसेच, गंभीर अटी घाला पण मला जामीन द्या, असे म्हणत रमेश म्हात्रेच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने आरोपी म्हात्रेला तात्काळ जामीन देण्यास नकार दिला असून शुक्रवारपर्यंत याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

डॉक्टरांना मारहाण करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेला तात्काळ जमीन देण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला. त्यामुळे, रमेश म्हात्रेला शुक्रवारपर्यंत जामीन मिळणार नाही, आता कारागृहातून बाहेर येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.  विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याच्या आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि मग प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याच्या रमेश म्हात्रेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तुम्ही मतदारांकडे जाता आम्हाला तुमची सेवा करायची आहे म्हणून मत मागता आणि निवडून आल्यावर मारहाण करता, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रेला खडेबोल सुनावले.

नगरसेवक अन् वकिलांनाही सुनावलं

लोक तुम्हाला मत देऊन निवडून आणता आणि निवडून आल्यावर फाईल आणि खुर्च्यांनी त्यांची डोकी फोडता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने असं वागायचं का? मारहाण करताना रमेश म्हात्रे अर्ध्या सेकंदाचाही वेळ दवडत नव्हते, ते सतत मारहाण करत राहिले जेणेकरून वेळ अजिबात वाया जाणार नाही, अशी टिप्पणी देखील उच्च न्यायालयाने केली. तसेच, रमेश म्हात्रे 73 वर्षीय वाटत नाहीत, तुम्ही त्यांचे मारहाणीचे व्हिडिओ बघितले का? मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी सरन्यायाधीश रवींद्र भाऊ यांची रमेश म्हात्रेंच्या वकिलांना विचारणा, ते टेबलवरून जवळ जवळ उड्या मारून डॉक्टरला मारहाण करत होते, असेही न्यायालायने म्हटले.

हेही वाचा

Comments are closed.