सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भाजपकडेच राहणार या चर्चेला अखेर ब्रेक लागला असून, बँकेच्या अध्यक्षपदी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची, तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीमधील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे बँकेच्या सत्तेचे समीकरण स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे जिह्याचे लक्ष लागले होते. बँकेच्या 21 संचालकांच्या संख्याबळानुसार महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले, तरी सत्तेतील वाटा आणि पदांच्या वाटपावरून घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्यासह जिह्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत राजकीय तडजोडीचा मार्ग स्वीकारला. महायुतीमध्ये कोणताही विसंवाद निर्माण होऊ नये आणि बँकेचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला.
या फॉर्म्युल्यानुसार, अध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे ठरल्यानंतर ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि कायद्याचे ज्ञान बँकेच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
निवड प्रक्रियेपूर्वी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नेत्यांनी समन्वय साधत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. निवड जाहीर होताच बँकेच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
Comments are closed.