दाऊदच्या घरावर बुलडोझर चालवला, पण न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक; 25 नोव्हेंबरपर्यंत कारवाईला स्थगिती
अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन आणि 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भेंडी बाजारातील वडिलोपार्जित घरावर अखेर मुंबई महापालिकेने आज सकाळी मोठय़ा पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली. मात्र याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करीत 25 नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याने ही कारवाई थांबवण्यात आली.
दक्षिण मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना ही इमारत आहे. दाऊद आणि त्याचे कुटुंब याच इमारतीत वास्तव्याला होते. ही इमारत अतिधोकादायक असल्याने महापालिकेने तिला सी-1 श्रेणीत वर्ग केले होते. यानुसार सी विभाग कार्यालयाने 16 नोव्हेंबरला पाडकामाची नोटीस बजावली होती. 18 नोव्हेंबरला नियोजित असलेली कारवाई स्थानिकांच्या विरोधामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी महापालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात पाडकामाला सुरुवात केली होती. मात्र पाडकामाच्या विरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता त्यांनी पाडकामाला स्थगिती दिली.
धोकादायक इमारत, प्रस्तावित रस्त्यामध्येही अडथळा
ही इमारत सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या (एसबीयूटी) भेंडी बाजार समूह पुनर्विकास प्रकल्पात येते. प्रस्तावित अंतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणातही या इमारतीचा अडथळा येत आहे. धोकादायक अवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने महापालिकेने पाडकामाची भूमिका घेतली होती. मात्र, इमारतीतील प्रार्थनास्थळाच्या पाडकामाला स्थानिकांनी विरोध केला. संबंधित ट्रस्टने पर्यायी प्रार्थनास्थळाची व्यवस्था केल्याचेही सांगण्यात आले.
Comments are closed.