खेड्यातील मुलांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी येणं महत्वाचं आहे : आ. ह. साळुंखे

A. h. Salunkhe : “जागतिकीकरण आपण स्वीकारलं असल्याने आपला देश खुला झाला आहे. भारताचा बऱ्याच भागात हिंदी चालते. हिंदी बरोबर इंग्लिश येणे अत्यंत महत्वाचं आहे. खेड्यातील मुलांना इंग्रजी येणं महत्वाचं आहे. ती चांगल्या दर्जाचे असली पाहिजे. नवीन शिकण्याची इच्छा असली पाहिजे. नवीन शिकत राहणं याला महत्व आहे. आपण योग्य प्रकारे कष्ट केलं पाहिजे”, असं आवाहन ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे यांनी केले. साताऱ्यामधील रयत शिक्षण संस्थामध्ये विसाव्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी शरद पवार यांच्यासह माजी खासदार श्रीनिवास पाटील, राजीव सर, कवी रामदास फुटाणे, अभिनेते सयाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित आहेत….

आ.ह. साळुंखे म्हणाले, शंभर पुरुषांच्या मागे 93 स्त्रिया हे प्रमाण अतिशय भयानक आहे. हे सांगण्याची गरज नाही याबाबतीत बोलू शकतो मला आपल्या ठेवायचा आहे. तो म्हणजे आमच्या सारखी आमच्या पिढीतली माणसं अगदी निरक्षर आई-वडिलांच्या पोटी जन्माला येऊन काहीतरी धडपडत करू शकली. पण आता स्थिती अशी झालेली आहे की गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचा गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळणं ही गोष्ट सोपी राहिलेली नाही. मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल याची व्यवस्था करणं हे गरजेचे आहे.

शरद पवार म्हणाले, आजच्या या जागतिक संमेलनाच्या निमित्ताने इथे येता आलं याचा मला आनंद आहे. १९८९ साली आम्ही काही लोकांनी बसून जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. त्याचे पहिले अधिवेशन आम्ही मुंबईमध्ये केले. त्या अधिवेशनामध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला गेला की, त्या अधिवेशनाला कुसुमाग्रज हजर होते, शंतनुराव किर्लोस्कर होते, लता मंगेशकर होत्या, मॉरिशसचे तत्कालीन शिक्षणमंत्री मराठी भाषिक होत्या त्याही हजार होत्या, आणि त्या अधिवेशनाचं उद्घाटन त्यावेळेचे परराष्ट्रमंत्री व नंतर देशाचे पंतप्रधान झालेले नरसिंह राव ह्यांनी केलं होतं. आणि तेव्हाचं त्यांचं वैशिष्ट्य हे होतं की नरसिंह राव यांचे संपूर्ण भाषण शुद्ध मराठीत होते. हैदराबाद मुक्ती आंदोलन आणि मराठवाडा याचा एक वेगळा संबंध होता. त्याच्यामध्ये स्वामीजींच्या नेतृत्वाखाली त्या काळात जे लोक पुढाकार घेत होते त्याच्यामध्ये नरसिंह राव होते. साहजिकच औरंगाबाद, नांदेडपरळी वैद्यनाथ या गावांशी सुसंवाद त्यांचा असल्यामुळे त्यांचे महाराष्ट्राशी घट्ट नातं होतं. अतिशय उत्तम भाषण त्यांचं त्यावेळेला दिलेलं मला स्वतःला आठवतं. आजचा हा कार्यक्रम साताऱ्याला होतोय. ‘जागतिक मराठी अकादमी’ आणि ‘रयत शिक्षण संस्था’ या दोघांच्या संयुक्त प्रयत्नाने आजचं संमेलन या ठिकाणी होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. या संमेलनामध्ये हनुमंतराव गायकवाड आणि राजीव खांडेकर या दोघांचाही आपण सन्मान केला. हनुमंतराव गायकवाड काही लाख तरुणांना काम देण्यासाठी यशस्वी झालेले हे उद्योजक आहेत. ते स्वतः शून्यातून आले. ते काही कारखानदार नव्हते, उद्योगपती नव्हते. कष्ट करायचे. सचोटी ठेवायची. जे काम करायचं ते अतिशय दर्जेदार राहील याची काळजी घ्यायची, हे काम त्यांनी अखंडपणाने केलं. तुम्हाला गंमत वाटेल आज त्यांच्याकडे जे अनेक संस्था आहेत, त्या संस्थेच्या स्वच्छतेचं काम त्यांच्याकडे आहे. आम्ही ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये शिरतो त्या ठिकाणी आत गेल्यानंतर पार्लमेंटच्या बाहेर कोणीतरी काम करणारी व्यक्ती माझ्याकडे बघितल्यानंतर पटकन म्हणते राम राम साहेब! आणि मी लगेच विचारतो तू हनुमंतरावांचा का? हो म्हणे हनुमंतरावांचा. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल आज देशाच्या पार्लमेंटची स्वच्छता यांच्या संस्थेकडे आहे. आज देशाचे राष्ट्रपती जिथे राहतात, राष्ट्रपती भवनाची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. नरेंद्र मोदी ज्या निवासात राहतात, प्रधानमंत्री यांचे निवासस्थानाची जबाबदारी यांच्याकडे आहे. या देशाचे लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि एअर फोर्स प्रमुख यांचे जी हेडकॉटर्स आहेत तिथल्या स्वच्छतेची जबाबदारी हनुमंतरावांच्याकडे आहे. म्हणून आत्ताच त्यांनी सांगितलं की आता त्यांचा सगळा उद्देश भारताच्या बाहेर आहे. काही हरकत नाही आम्हाला त्याचा आनंद आहे. पण अजूनही भारतामध्ये नोकरीच्या संबंधित आवश्यकता असलेला फार मोठा तरुणांचा वर्ग आहे त्याच्या हिताची जपणूक तर कराच पण ते करत असताना तुम्ही भारताच्या बाहेर आपण या कामात लक्ष घातलं तर माझी खात्री आहे की नव्या पिढीला, मराठी मुलांना एक प्रचंड क्षितिज खुलं होईल. त्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल याचा मला स्वतःला आनंद आहे. म्हणून आमचे सहकारी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला हे संमेलन आयोजित करण्यासाठी त्यांनी हनुमंतरावांची निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तशीच निवड त्यांनी राजीव खांडेकर यांची केली. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणारे, जिथे मर्यादा सांभाळायची ती मर्यादा सांभाळणारे आणि जिथे स्पष्ट मत व्यक्त करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कधीही काटकसर न करणारे असा पत्रकार म्हणून आज त्यांचा उल्लेख ठीक ठिकाणी केला जातोय. मला आनंद आहे की आज त्यांची या ठिकाणी निवड करून आपण त्यांना सन्मानित केलं.
सातारा हे एक आगळं वेगळं ठिकाण आहे, ही शौर्यभूमी आहे. १६५९ साली सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यामध्ये अफजलखानचं पारिपत्य झालं आणि सह्याद्रीची डरकाळी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली, हे काम साताऱ्यातून झालं. सातारा ही पराक्रमाची भूमी आहे पण त्याचबरोबर सुधारकांची, स्वातंत्र्यसैनिकांची, साहित्यिकांची देखील जन्म आणि कर्मभूमी आहे. महात्मा जोतिबा फुले हे खटाव तालुक्यातील कटगूनचे, सावित्रीबाई फुले खंडाळा तालुक्यातील नायगावच्या, गोपाळ गणेश आगरकर कराडच्या टेंभूचे या सगळ्यांचा जन्म साताऱ्यात झाला.

कृष्णा – कोयना नदीच्या परिसरामध्ये साहित्य निर्मिती होत होती. माणदेशात कणखर नेतृत्व आणि कलाकार घडले. याच भूमीने ‘हर हर महादेव’चा नारा त्या कालखंडात घेतला आणि याच भूमीमध्ये क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कृष्णाकाठी मराठी पोहोचताच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री ह्यांनी तिला संस्कारित केलं. महाराष्ट्राला भूषण असा विद्वान पंडित, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक त्यांच्या रूपाने लाभला. लोकहितवादी ह्यांची शतपत्रे वाईत तयार झाली.  आणखी किती नावं घ्यावीत? न. चि. केळकर, काकासाहेब कालेलकर, श्री. म. म्हात्रे, संत साहित्याचे अभ्यासक मास्तर इनामदार, डॉ. सरोजिनी बाबर उपराकार लक्ष्मण माने आणि आजच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे हे सगळे सातारकर म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने जगभरात पसरलेल्या मराठी मनाचा शोध महाराष्ट्राचा लौकिक जगभरात पसरवणारा मान्यवरांच्या समोर घ्यावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि तो यशस्वी होतो आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत.

जागतिक मराठी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्यिकांचा मेळावा आयोजित करणे हा नाही. साहित्यांने मनाचं आणि मेंदूचं पोषण होतं पण साहित्य साधनेने पोटाचा प्रश्न सुटेल असं नाही. त्यासाठी मराठी माणसाने व्यापार उद्योगाची, विशेषतः कला कौशल्याची क्षेत्र याच्यातही प्रवेश केला पाहिजे. जागतिक संमेलनाच्या व्यासपीठावरून त्याबद्दल विचार, माहिती आणि अनुभव हे आदान प्रदान केले पाहिजेत. माझी खात्री आहे अनेक देशांतील लोक या ठिकाणी आले त्यांना मला भेटायची संधी मिळाली. त्यांच्यात जो काही सुसंवाद होईल तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे.

या प्रदर्शनाचा संपूर्ण कार्यक्रम मी बघितला. यातील एक विषय हा मला अतिशय आकर्षित करणारा आहे. तो आकर्षित करणारा विषय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे नवीन तंत्रज्ञान आणि याची माहिती सामान्यांना व्हावी याकरिता गेली चार-पाच वर्षे मी स्वतः प्रयत्न करतोय. बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेत याच वर्षी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी विद्यापीठाबरोबर मी एक सामंजस्य करार केला. त्या करारामध्ये शेती आणि शेतीचे उत्पादन कसं वाढवता येईल? याचा विचार आम्ही केलेला आहे. एक कुठलं तरी पीक तुम्ही घ्या असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मला सुचवल्यानंतर आम्ही उसाचं पीक घेतलं. या उसाच्या पिकासाठी एआय वर आधारित अशी मार्गदर्शक प्रणाली आम्ही तयार केली. उद्याची जानेवारीच्या १५ तारखेला बारामतीला ‘कृषक’ हे एक अधिवेशन होणार आहे, भव्य कृषी प्रदर्शन होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हा कोणाला येणं शक्य असेल तर त्या ठिकाणी एआयच्या तंत्रज्ञानाने तयार केलेले उसाचे पीक हे तुम्हाला पाहायला मिळेल. खत, कीटकनाशके, पाणी याचं योग्य प्रमाण राखलं तर श्रम आणि पैसा ह्याची बचत होते आणि दर्जेदार पीक हे तुम्हाला पाहायला मिळतं. आज तुम्ही त्या ठिकाणी जर गेलात तर साधारणतः ऊस हा आपण महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी पाहतो. त्या ऊसाला किती कांडी असतील? १५-१५-१६ असतील. पण एआयच्या माध्यमातून केलेला ऊस तिथे ४०-४२ कांड्या बघायला मिळतील. त्या ऊसाची उंची आपल्या नेहमीच्या उसापेक्षा अधिक असलेली बघायला मिळेल. ते पीक पाहण्यासाठी उभं आहे. येत्या १५ जानेवारीपासून शेतकऱ्यांना ज्यांना ते पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते खुलं राहणार आहे. हे होऊ शकलं ते हे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे Artificial Intelligence चं आज त्याचा प्रचार हा केला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी माणसाने अशा सगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या संबंधी आस्था ठेवली आणि ती लोकांसमोर पोहोचवण्याचे प्रयत्न केला तर माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता महाराष्ट्राच्या अर्थकारणातच नव्हे तर देशाचे अर्थकारण हे बदलून ठेवण्यासाठी आपल्याला यश मिळू शकेल.

मराठी माणसाने इतिहासात अनेक रणमैदाने गाजवली. पराक्रमाची शर्थ करून तलवारीच्या जोरावर अटकेपार झेंडे लावले. आता बुद्धी कौशल्य, व्यापार उद्योग विषयी व्यवहार ज्ञान याच्या जोरावर देश विदेशामध्ये जाऊन पराक्रम गाजवायचा आहे. त्याच्यासाठी केवळ इतिहासामध्ये रमून चालणार नाही, धडे घ्यावे लागतील. शिवछत्रपतींचे आरमार उभे राहिलं कारण व्यापार-उदीमातून राज्याचे उत्पन्न वाढावे ही त्याच्या मागे दृष्टी होती. केवळ पिकांवर कर लादून स्वराज्याचे सुराज्य होणार नाही हे मात्र छत्रपतींना माहीत होतं. नव्या पिढीला व्यापार आणि वाणिज्याचे महत्त्व शिकावं या दृष्टीने सुरतेवरचा हल्ला सुद्धा त्याच्या पाठीमागे व्यापार आणि उद्योग ही दृष्टी मराठी जणांमध्ये वाढवली ही होती हे आपल्याला मान्य करावे लागेल.

लहानपणापासून रोबो तंत्रज्ञान, थ्री डी, ड्रोन तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता या नव तंत्रज्ञानाची किमान तोंड ओळख व्हायला हवी आणि त्याचबरोबर मग शेअर्स असतील, बिटकॉइंस असतील, क्रिप्टो करेंसी असतील आणि वाणिज्य उद्योगाची ही नवी परिभाषा आहे त्याची सुद्धा गोडी आमच्या तरुणांना लावण्याबद्दल आवश्यकता आहे. कर्मवीरांनी शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गोरगरिबाच्या उंबरठ्यावर आणून दिली. ग्रामीण भागात अनेक पिढ्या सुशिक्षित करून राष्ट्रबांधणीसाठी आज त्या काम करतात. कर्मवीरांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था या संमेलनाचे संयोजक संस्था आहेत आणि ह्या संस्थने देखील नवतंत्रज्ञानात सुरू केलेलं आहे हे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी अतिशय आनंदाने सांगू शकतो. मी सतत सांगत आलेलो आहे की कुटुंबामधल्या एकाच व्यक्तीने शेती केली पाहिजे. कुटुंबातील एक तरी व्यक्ती स्वावलंबाच्या मार्गाने पुढे जायला पाहिजे. महिला या कुटुंब व्यवस्थेच्या अविभाज्य भाग आहेत. त्यांचे सबलीकरण झाल्याशिवाय कुटुंब आणि देश पुढे जाणार नाही. मी देशाचा कृषीमंत्री असताना माझ्याकडे कृषी प्रक्रिया उद्योग खात्याची जबाबदारी ही सुद्धा होती. कृषी आधारित उद्योग ग्रामीण भागात उभे राहावे यासाठी फूडपार्कची उभारणी करण्यावर मी भर दिला. सातारा भागात असा एक फूडपार्क मंजूर केला. मला वाटतं हनुमंतराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने इथला तो  फूडपार्क उभा राहिलेला आहे. ठाणे, पुणे, मुंबईनाशिक, औरंगाबाद या उद्योग पट्ट्याच्या बाहेर उद्योग आणि व्यापार याचा विकास व्हायला पाहिजे. सातारा, सांगली, कोल्हापूर हा सुद्धा उद्योग व्यापाराचा सुवर्ण क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. कृषी आधारित उद्योग, आयटी हे या भागाची नैसर्गिक संपदेचे संवर्धन करून उभे राहू शकतात.

माझ्या कानावर अशी गोष्ट आली की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात ५०० एकर क्षेत्रावर कृषी आधारित उद्योग उभं करण्याचं जाहीर केलं. तो त्यांनी पूर्णत्वास न्यावा अशी माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. कोयना धरणाच्या आसपास एक नवीन पर्यटनस्थळाची संकल्पना विकसित होत आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटनातून नवीन रोजगार सुद्धा मिळेल. २० व्या जागतिक मराठी संमेलनाला आज सुरुवात होत आहे. संमेलनाचे उद्घाटन झाले असे उद्घाटक म्हणून मी जाहीर करतो आणि हा तीन दिवसांचा सोहळा सारस्वतांसाठी, उद्यमशील तरुणांसाठी, शेतकरी बांधवांसाठी एक पर्वणी ठरेल याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सर्वांनीच पुढे २ दिवस संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे. अनेक लोक या ठिकाणी येतील, अनेक लोक या ठिकाणी आता आहेत की ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वी झाले. आज हा जो आपला सोहळा आहे या सोहळ्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी आमच्यातले एक सहकारी आज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे नाव रामशेठ ठाकूर. त्यांनी २५ लाख रुपये या संमेलनासाठी दिलेत. रामशेठ कर्मवीरांनी स्थापन केलेल्या कमवा आणि शिका यामध्ये तयार झालेले विद्यार्थी आहेत.

दारिद्र्य प्रचंड होतं. मेहनत करणे, कष्ट करणे आणि त्याच्यातून शिक्षण घेणे व त्याच्यातून व्यवसाय करणे हा त्यांनी निर्धार केला होता. इथल्या गांधी टेकडीवर त्यांनी काम केलं. तिथे शिकले. पुढे नंतर आपल्या भागात गेले तिथे कष्ट करायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल या रयत शिक्षण संस्थेला रामशेठ ठाकूर यांनी १०० कोटी रुपये देणगी दिली कशाचीही अपेक्षा न करता. कशासाठी तर तलासरी डहाणू या आदिवासी पट्ट्यामध्ये रयतेची शाळा निघावी रयतेचे कॉलेज निघावे आणि मी त्या ठिकाणी जाणार हे कळल्यावर ते त्या ठिकाणी आले आणि तिथे येऊन ही मोठी रक्कम त्यांनी जाहीर केली. आजच्या या सोहळ्याला ते या ठिकाणी उपस्थित आहेत.

माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये किती शैक्षणिक संस्था, सार्वजनिक संस्था या उभारण्यासाठी किती कष्ट केले? किती भांडवली गुंतवणूक केली? आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता हे महाराष्ट्राच्या बाहेर हे आमचे मराठी बांधव देशाच्या बाहेर सुद्धा कुठे ना कुठेतरी कष्ट करतात. मराठी माणसांमध्ये असे सुद्धा घटक आहेत याची नोंद ही त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी त्यांची ओळख करून द्या, त्यांची माहिती या ,ठिकाणी द्या. माझी खात्री आहे की त्याचा एक आनंद सर्वांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद आहे की आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होता आलं. माझी खात्री आहे की उद्याच्या दोन दिवसांमध्ये अत्यंत यशस्वीपणाने हा सबंध सोहळा आपण पार पाडाल आणि नव्या पिढीसमोर एक प्रकारचा प्रेरणादायक आदर्श ठेवाल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.