तुटलेलं लग्न जुळवून देतो म्हणत भोंदूबाबाने फसवले, महिलेवर लैंगिक अत्याचार; दोघांना अटक

अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथील एका युवकाने अनेक मुलींचे लैंगिक शोषण करुन फसवणूक केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रमाणेच या तरुणाने मुलींचे शारिरीक शोषण करतानाचे व्हिडिओ बनवले होते, जे व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. आता, जिल्ह्यातील एका 35 वर्षीय महिलेच्या (Women) असहायतेचा फायदा घेत भोंदूबाबाने तिला जाळ्यात ओढल्याची घटना समोर आली आहे. तुटलेले लग्न पुन्हा जोडून देतो, असे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

रियाजोद्दीन (45) आणि वसीम (32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पीडित महिलेचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न तुटले. काही दिवसांपूर्वी ही महिला रस्त्याने जात असताना तिची ओळख रियाजोद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली. महिलेने त्याच्या मोबाईलवरून लग्न तूटलेल्या तरुणासोबत संपर्क साधला. त्यावेळी रियाजोद्दीनने महिलेची सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि तिच्या असहायतेचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने महिलेला विश्वास दिला की, त्याच्या परिचयातील वसीम नामक व्यक्तीकडून विशेष पूजा करून घेतल्यास तिचे तुटलेले लग्न पुन्हा जुळेल आणि सर्व अडचण दूर होईल. त्यानंतर त्याने पीडित महिलेला वसीमकडे पाठवले. वसीमने पूजेच्या नावाखाली महिलेकडून 25 ते 30 हजार रुपये उकळले. दरम्यानच्या काळात रियाजोद्दीनचे महिलेच्या घरी येणे-जाणे वाढवले आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत या भोंदूने तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, आरोपीचा त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित महिलेने नांदगाव पेठ पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

बिर्याणी, कलिंगड खाल्ले, दुसऱ्या दिवशी भयंकर घडले; एकापाठोपाठ 4 जणांचा मृत्यू, मुंबईतील हादरवणारी घटना

आणखी वाचा

Comments are closed.