फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्क

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांनी महापूजा केली. त्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं अध्यात्मिक महत्त्व आणि विकासासंदर्भाने भाषण केलं. पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात, त्यामुळे केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचं रुप बदलेल असा विकास करू, सोलापूरला (Solapur) वाढवण बंदराशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे म्हणत लवकरच येथे आयटी पार्कही सुरू होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन थांबवण्यासाठी देखील आपण काम करतोय, अशी माहितीही त्यांनी दिली. तर, पंढरपूर कॉरिडोअरसंदर्भात व्यापाऱ्यांना विश्वास देत, तुमचा धंदा 10 पट वाढेल असेही त्यांनी म्हटलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे. या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय, हा विजय विकासाचा विजय, विकासाच्या मुद्यावर ज्यांचा विश्वास त्यांचा विजय आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना सांगतो की, अनेकांना वाटतं माझ्यामुळेच मी निवडून आलो, त्यामुळे त्यांचा व्यवहार बदलत जातो. लोकं जसा तुमचा विकास पाहतात तसा तुमचा व्यवहारही पाहतात. एकवेळ विकास कमी चालेलं पण व्यवहार लोकं जास्त लक्षात ठेवतात, एखादं काम होणार नसेल तरी लोकं म्हणतात आमच्याशी कसा वागतो, असे म्हणत काही लोकप्रतिनिधींना चिमटेही काढले. भाजपची परीक्षा ही मोदींनी कामे केलं यावर होणार आहे, पण स्थानिक व्यवहारावरुनही होणार आहे. आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, एखाद्याचा पद गेलं तरी चालेल, चांगल्या कामाशी देवाभाऊ पाठीशी पण चुकलात तर चुकीला माफी नाही, असेही फडणवीसांनी सोलापुरातील नवनिर्वाचित सदस्यांना ठणकावून सांगितलं.

लवकरच आयटी पार्क सुरू करू – फडणवीस

सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, पण आमचा प्रयत्न आहे याचं वर्षात ते महाविद्यालय सुरु व्हावं. आयटी पार्क घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यासाठी जमीन देखील दिली. आता, लवकरच हे आयटी पार्क सुरु करून शिकलेल्या लोकांना इथंच कामं द्यायचा प्रयत्न आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क तयार करू, सोलापूरसाठी पाणी आम्ही आणलं आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना केली. हे कामं फार अडचणीच असतं, त्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालाव लागेल. जेव्हा मतं मागायला जाऊ तेव्हा प्रत्येकाच्या घरात पाणी मुबलक असायला हवं. उड्डाणपूलाच्या बाबतीत केंद्राच्या अडचणी असतील तर आम्ही 15 दिवसात बैठक लावून घेतो. सोलापूरचं एअरपोर्ट आणि त्यावरुन विमानसेवा सुरु झाली. आता नाईट लँडिंग आणि मुंबईला योग्य वेळेत विमान जाईल अशी सुविधा द्यायची आहे, असेही फडणवीसांनी म्हटले. तसेच, ऑपरेटर जो स्लॉट मागेल नवी मुंबई विमानतळावर द्यायची जबाबदारी माझी आहे, असेही त्यांनी सांगितले.

तर तुम्हीच माझं नाव बदला

महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही समजून दिली, त्यांच्या स्मारकासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, पंढरपूरला कॉरीडॉर करतोय, अनेकजण शंका घेत आणि लोकांना घाबरवण्याचे कामं करतायत. पण, मुबलक मोबदला देतोय, ज्यांचं दुकानं त्याना दुकानं, जे योजनेत बसणार नाही त्याना स्पेशल पॅकेज देऊ. आज जो धंदा पंढरपूरमध्ये दुकानदारांचा होतोय, कॉरीडॉर झाला तर धंदा दहापट वाढेल अन्यथा माझं नावं तुम्हीच बदला, असेही फडणवीसांनी म्हटलं. अनेकांना पंढरपूरत यायचं आहे पण व्यवस्था नसल्याने लोकांना येता येतं नाही, केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचा रूप बदलेल असा विकास करू. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचा काम आम्ही करणार आहोत, उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन थांबवण्यासाठी कामं करतोय, आजच बार्शीला भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त जाऊन आलोय. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट ही महाराष्ट्राची अध्यात्मिक शक्ती या पंचक्रोशीत आहे. सोलापूरकरांचा विश्वास वाया जाणार नाही याचा शब्द देतो, तुमची प्रमाणिक सेवा निवडून आणलेले लोकप्रतिनिधी करतील याचा शब्द देतो, भाजपला ना तुफान थांबवू शकतो ना ऊन हे तुम्ही दाखवून दिलं असे म्हणत विजयी लोकप्रतिनिधींचं कौतुकही मुख्यमंत्र्‍यांनी केलं.

हेही वाचा

राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची…’

संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे

आणखी वाचा

Comments are closed.