मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; फडणवीसांनी सगळं सांगितलं

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधानपरिषद निवडणुकांच्या (Election commission) 17 जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून, केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवर शिवसेनेसोबत (शिंदे गट), तर पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) भाजपची सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे. मित्रपक्षांचे नेते एकत्र बसून यावर अत्यंत सन्मानजनक तोडगा काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजधानी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्यासमवेत साखर उद्योगसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांची बैठक होती, त्यासंदर्भाने चर्चा करण्यासाठी आलो होतो, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, विधानपरिषद निवडणुकांच्या जागेचा तिढा दिल्लीत नाही तर मुंबईत सोडवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेच्या 17 पैकी 12 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती असून शिंदेंच्या शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज तिन्ही पक्षाचे प्रमुख दिल्लीत होते. त्याच अनुषंगाने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीनंतर माहिती दिली. विधानपरिषद निवडणुकीबाबत मी पुन्हा सांगतो, आमचं जवळपास अॅग्रीमेंट झालेलं आहे, फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर येथील जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. राष्ट्रवादीने आमच्याकडे पुण्याची जागा मागितलेली आहे, सध्या याच गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद निवडणुकांवर भाष्य केलं. कठीण पेपर संपलाय, आता सोपा पेपरही आम्ही सोडवून घेऊ, टीकमार्क करायचं बाकी आहे, ते होऊन जाईल.

मुंबईतच प्रश्न सोडवला जाईल

विधानपरिषदेत इतक्या आधी गोष्टी होत नाहीत, त्या वेळेवर होतात. त्यामुळे, उमेदवारी अर्ज भरतेवेळीच सर्वकाही अंतिम होईल, जागावाटप असेल किंवा उमेदवारांची नावे असतील, असेच फडणवीस यांनी सूचवले आहे. गृहमंत्री महोदय आमचे नेते आहेत, त्यांच्यासोबत बसून आम्ही चर्चा करत असतो. मात्र, विधानपरिषदेच्या जागेचा प्रश्न मुंबईतच सोडवला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड जिल्ह्यातील जागांसाठी आग्रही आहे, तर शिंदेंची शिवसेना संभाजीनगरची जागा आपल्याकडेच राहावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी: 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

हेही वाचा

Election : महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार, जागावाटपही जवळपास निश्चित

आणखी वाचा

Comments are closed.