धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
ठाणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात झालेल्या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे प्रचंड मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विरोधक सातत्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठोस पुरावे मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी भूमिका घेत धनुभाऊंना अभय दिले आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परळीत आले असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. मात्र, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमधून जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे आपली दखल घेतली नव्हती, अशी खंत बोलून दाखवली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही अजित पवार यांनी त्यांना अभय दिले आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊनसुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे . 2019 मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते, पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे तीन आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या, रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत. सत्य देवाला माहीत पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालक मंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर … अशा खूप जखमा आहेत. पण कधीच हिशोब दिला नाही, की मी हे केले मी ते केले. 2004 ते 2014 जेव्हा कोणी उभे राहायला तयार नव्हते, तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन. मीच करतो मीच करतो असे केले नाही, कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊन सुधा दादा छाती चा कोट करून उभे आहेत ..
मी किती कमनशिबी आहे ..
२०१९ मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते .. पण..
एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे… https://t.co/a3lfsf3ybq
अजितदादांच्या सगळ्यांदेखील धनंजय मुंडे यांना कानपिचक्या?
अजित पवार यांनी गुरुवारी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात मी पालकमंत्री म्हणून गुन्हेगारी खपवून घेणार नाही, असे निक्षून सांगितले होते. याशिवाय, अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते. अजित पवार यांनी म्हटले होते की, उगीचच मी नुसता आलो की, मला मोठा हार द्यायचा, बुके द्यायचा, पांडुरंगाची मूर्ती द्यायची. पण त्यांनी काय सांगितलंय ते पण बघा ना, साधुसंतांचे विचार आहेत, इतर काही गोष्टी आहेत. आता तुम्ही अपेक्षा करत असाल, आता दादा आलाय तर काही काळजी नाही, ते डोक्यातून काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजितदादांच्या या वक्तव्याचा रोख धनंजय मुंडे यांच्या दिशेने होता का, अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.