राज ठाकरेंची जैन समाजाने मागितली माफी, शिवरायांच्या जिरेटोपाच्या अपमानाचं प्रकरण मिटलं

मालाड छत्रपती शिवाजी महाराज जिरेटोप वाद: काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जिरेटोपावर (Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop Controversy) जैन समाजाचा (Jain Community) झेंडा लावल्याची एक वादग्रस्त घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर, मालाड (Malad) येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी अस्मितेचा मान राखत, आपल्या खास शैलीत जैन समाजाच्या प्रतिनिधींना समज दिली.

मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीनं थांबलं पाहिजे आणि मराठी अस्मितेचा आदर राखला गेलाच पाहिजे…”, अशा कडक शब्दांत राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला सुनावलंय.

जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलंय. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे.

या भेटीनंतर मालाडमधील तो वाद आता शांततेनं मिटल्याचं चित्र असून, मनसेकडून मराठी अस्मितेबाबतची भूमिका नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली आहे.

प्रकरण नेमकं काय?

मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन झेंडा लावल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर झेंडा लावल्यानं वाद निर्माण झालेला.

मुंबईतील मालाड (पूर्व) भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाची प्रतिकृती उभारण्यात आलीय. त्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता. यामुळे शिवप्रेमी आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आक्रमक झाली. नंतर संबंधितांनी जाहीर माफी मागितली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जैन समाजाला कडक समज दिली.

Comments are closed.