नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा


मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आज मनसेचा (MNS) पदाधिकारी मेळावा मुंबईत पार पडला. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे मेळाव्यातून मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला. तसेच, निवडणूक आयोग आणि केंद्र व राज्य सरकावरही तोफ डागली. तर, मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी, चाटुगिरी कारावी, असे म्हणत मराठीn (एकनाथ शिंदे) लक्ष्य केलं. राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं. 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या, असे राज ठाकरेंनी म्हटले.

राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळासंदर्भाने एकजुट बांधली असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाच्या मेळाव्यातून 1 तारखेच्या मोर्चाला हजर राहण्याचे आवाहन मुंबईकरांना केलं आहे. मी स्वत: लोकलने मोर्चाला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार, गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय. लोकं आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रुपांतर होतं नाही. पण, या सर्व भानगडीमुळे  आपला पराभव होतो. अख्खा देश बोंबलतोय, याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवं तसं वागायचं असे म्हणत राज यांनी विरोधकांवर टीका केली.

आणखी 1 वर्षे निवडणूक पुढे ढकला, पण..

गेली 5 वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत, आधी मतदार याद्या स्वच्छ करा. आणखी 1 वर्ष निवडणुका घेऊ नका, मतदार याद्या स्वच्छ झाल्या की घ्या. मग जर पराभव झाला तर आम्ही स्विकारतो. पण, मॅच फिक्स आहे. मुख्य निवडणुक आयोग सांगतात सीसीटिव्ही ही प्रायव्हसी आहे. मत देणं ही प्रायव्हसी असू शकते, पण मतदार ही प्रायव्हसी कशी असू शकते? जे पटत नाही, पचत नाही अशी उत्तरं ते देतात, असे म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले.

खुर्चीसाठी किती लाचारी, नमो टुरिझम सेंटर फोडणार

आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी पाहा, किती स्वाभीमान गहाण टाकायचा ह्याला काही मर्यादाच नाहीत. हे शिंदेचं खातं. ह्याचा जीआर देखील काढलाय, हे जर ऐकाल तर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार काही टुरिझम पाँईट काढत आहेत. त्यासाठी, रायगडशिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर काढत आहे. आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर, जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं, हे उभं केलं जातंय. मी आत्ताच सांगतो उभं केलं की फोडून टाकणार. मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, खाली किती चाटुगिरी चालूय हे पंतप्रधानांनाही माहिती नसेल, असे म्हणत राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं.

काहीही करा पण मोर्चाला या, दिल्लीला दिसू द्या

बोट ठेवेल ती जागा अदानीला देत आहेत, हे सर्व येतयं सत्तेतून. सत्ता येते मतदानातून, म्हणूनच आपला 1 तारखेचा दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीला कळालं पाहिजे महाराष्ट्रात काय आग पेटलीय ते, मोर्चा का काढला आहे ते. त्यामुळेच, माझं महाराष्ट्राच्या मतदारांना, मनसैनिकांना आवाहन आहे, या मोर्चात सामील व्हा. महाराष्ट्रात हा जो काही प्रकार चालू आहे, आज नोकरी होती बॉसने नाही पाठवलं तर बॉसच्या गालावर मारा, तोही एक मतदारच असेल. सध्या हे सुरू आहे ते मतदारांचा अपमान सुरू आहे, हे सर्व सुधारलं पाहिजे. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे. पुढारलेल्या देशातही निवडणुकीसाठी बॅलेट पेपर वापरतात, हे मी एकटा नाही बोलत, पंतप्रधान मोदीही बोलतात, हे गांभीर्याने घ्या, असे म्हणत राज ठाकरेंनी मोर्चाला येण्याचं आवाहन मतदारांना केलंय.

आयुक्तांच्या बंगल्यावर 550 लोकांची नोंद

निवडणुकांवेळी घरा घरात जाऊन पहा चेहरे ओळखले गेले पाहिजे. नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर 550 लोकांची नोंदणी आहे. एकाचा पत्ता सुलभ शौचालय आहे, काय बसल्या बसल्या सही घेतली काय, असा मिश्कील टोलाही राज ठाकरेंनी लगावला. काहीही सुरू आहे हा पोरखेळ नाही, तुमच्या आमच्या आयुष्यातील 5 वर्ष जात आहेत. या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, त्या स्वप्नांची राख रांगोळी मशीन करणार असतील तर काय उपयोग? घरा घरात जाऊन बघा कुठले चेहरे आहेत ते, कायदेशीर गोष्टी करायच्या ते करू. पण, ही खूप मोठी लढाई आहे, यातही महाराष्ट्रचं पुढे पहिलं पाऊल टाकेल, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

हेही वाचा

मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर, गोळी झाडल्यानंतर पोलिसांचं प्रत्युत्तर, छातीत गोळी लागली

आणखी वाचा

Comments are closed.