सुनेचा 8 वेळा गर्भपात केला, मानसिक अन् शारीरिक छळ, कारण ऐकून सगळेच हादरले; नाशिकमधील धक्कादायक
नाशिक क्राईम न्यूज : प्रेमविवाह केल्यानंतरही ‘जात’ वेगळी असल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik Crime News) उघडकीस आली आहे. “तू आमच्या जातीची नाहीस,” असे टोमणे मारत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला, तसेच तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप आहे. या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने न्यायासाठी पोलिसांचे दार ठोठावले असून, नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News: “तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही”
पोलीस तक्रारीनुसार, पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या वेगवेगळ्या जातीवरून सासरच्या लोकांनी छळ सुरू केला. महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर, “तू आमच्या जातीची नाहीस, त्यामुळे तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही,” अशी भूमिका सासूने घेतली. सासरच्या घटकांकडून सतत मानसिक दबाव आणून आणि शारीरिक छळ करून विवाहितेचा एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणण्यात आला.
Nashik Crime News: मानसिक रुग्णालयात भरती करण्याची धमकी
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासू-सासऱ्यांकडून तिला सतत शिवीगाळ केली जात होती. एवढेच नव्हे तर, “तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात (Mental Hospital) ॲडमिट करू,” अशी धमकीही तिला देण्यात आली. पीडित महिला पुण्यात नोकरी करत होती. तिथली नोकरी सोडल्यानंतर जुलै 2025 मध्ये ती नाशिकला परतली. त्यानंतर सासरच्या लोकांकडून होणारा हा छळ अधिकच वाढला.
Nashik Crime News: दागिने विकून पैसे लाटले; हुंड्यासाठीही तगादा
नाशिकमध्ये स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी पतीने विवाहितेचे सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे घेतले होते. त्यानंतरही पैशांसाठी आणि हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता. केवळ जात वेगळी असल्याच्या कारणावरून तिला घरात आणि समाजात सन्मानाने जगू दिले जात नव्हते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.
Nashik Crime News: पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणाची दखल घेत म्हसरूळ पोलिसांनी पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जातीभेदातून आणि हुंड्यासाठी झालेल्या या छळामुळे नाशिक परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, म्हसरूळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.