संतापजनक… पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक

पुणे: राज्यातील गुन्हेगारीच्या घटना, त्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. याउलट लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनाही समोर येत आहेत. आता, पिंपरी चिंचवडमध्ये (Pune) संतापजनक घटना घडली आहे. येथील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली. अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याकरणी 47 वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. या घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, काळेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी माहिती दिली.

दरम्यान, या संतापजनक घटनेनं लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

हेही वाचा

धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

आणखी वाचा

Comments are closed.