अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? सुषमा अंधारेंचा सवाल
पुणे : परतवाड्यातील आरोपीच्या घरावर ज्या प्रमाणे बुलडोझर चालवला, त्याचप्रमाणे अशोक खरातच्या फॉर्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार? रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? असे प्रश्न ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. राज्यात महिलांचे शोषण होत असताना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे अजूनही शांत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. या प्रकरणात ज्यांचे ज्यांचे नाव आले आहे त्याच्यावर मुख्यमंत्री कधी कारवाई करणार? असंही सुषमा अंधारे यांनी विचारलं.
नारी शक्ती बिल नंतर आणा, आधी महिलांना संरक्षण द्या. त्यासाठी चाकणकर, केसरकर आणि एकनाथ शिंदेंवर कारवाई करण्याची धमक गृहखात्याची आहे का? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला.
बुलडोझर कधी चालवणार?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “ज्या तत्परतेने परतवाडा प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला, तशीच कारवाई अशोक खरातवर कधी करणार? या प्रकरणाशी संबंध आलेल्या रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? या प्रकरणाला एक महिना झाला तरी खरातच्या घरावर बुलडोझर का चालवला जात नाही? तशी कारवाई केली जात नसेल तर त्यांना तटकरे किंवा ठाणेकरांचा वरदहस्त आहे का?”
आदिती तटकरे शांत का?
सुनेत्रा पवार आणि आदिती तटकरे या प्रकरणी कधी बोलणार आहेत? या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काय जबाबदारी पार पाडली? निवडणुकांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही महिलांची सुरक्षा आहे. त्यासाठी तुम्ही काय करत आहात? महिलांच्या सुरक्षेवर महिला आणि बालकल्याण मंत्री शांत का? या खात्याच्या मंत्री म्हणून तुम्ही काय पाठपुरावा केला? तुम्हाला मंत्री करणाऱ्या अजितदादांसाठी तुम्ही काय करत नाही, तिथे तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार?
आदिती तटकरे यांनी या प्रकरणावर एक तरी वाक्य बोलावं. नुसता मंत्रिपद घेऊन शांत बसू नये, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
प्रतिभा चाकणकर म्हणतात की त्यांच्या सह्या बनावट आहेत. पण त्यांना पुढे करून रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? समता पतसंस्थेतील खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर त्याचे संचालक बनावट आहेत का ? प्रतीभा चाकणकर यांना नोटीस आली नव्हती, तर मग त्या पोलिसांना भेटायला का गेल्या होत्या? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले.
शिंदे-केसरकरांना चौकशीला कधी बोलावणार?
अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? रुपाली चाकणकर या गजाआड कधी करणार? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
आणखी वाचा
Comments are closed.