कधी आमदार निवासात बॉक्सिंग, कधी आई-बहिणींवरुन शिव्या, आमदारकीला कलंक लावलेले संजय गायकवाड कोण?
संजय गायकवाड वाद शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे कायम आपल्या रोखढोक आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. मग ते अगदी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण असो किंवा शेतकऱ्यापासून ते पोलिसांबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य असो, आमदार गायकवाडांचा जवळचा संबंध राहिला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा वादग्रस्त कृतींमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बुलढाण्यातील (Buldhana) आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) अनेक पैलू उलगडणारं आणि कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) लिखित ‘शिवाजी कोण होता’ (Who was Shivaji? Book) या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला आहे. प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता…?’ या पुस्तकाच्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं असून स्वात गायकवाड यांनी याबाबत स्पष्टीकरण देत या प्रकारची कबुली दिली आहे. मात्र आमदार संजय गायकवाड यांचे आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्याने ते अडचणीत सापडले आहे.
आमदारकीला कलंक लावलेले संजय गायकवाड कोण? (Sanjay Gaikwad Controversial Statements)
फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार – 19 एप्रिल 2021
कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना संजय गायकवाडांनी त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारण करत असल्याची टीका केली होती. त्यावरून त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केलं होतं. ते म्हणाले होते की, “सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहेत. मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन.”
शिवजयंती मिरवणुकीतील मारहाण – मार्च 2024
गेल्या वर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी एका तरुणाला काठीने मारहाण केली होती. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाख रुपये बक्षीस – सप्टेंबर 2024
राहुल गांधी यांच्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले होते की, राहुल गांधींची जो जिभ कापेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार. गायकवाडांनी लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्याविरुद्ध हे वक्तव्य केलं आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
महाराष्ट्र पोलिस जगातील सर्वात अकार्यक्षम – एप्रिल 2025
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल.
मतदारांना फक्त दारू अन् मटण पाहिजे – जानेवारी 2025
विधानसभेच्या निवडणुकीत कमी मते पडल्यानंतर एका जाहीर सभेत संजय गायकवाडांनी मतदारांना शिव्या दिल्या. मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे. हे दोन हजारात विकले जातात. यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य – 7 जुलै 2025
भाषेच्या मुद्द्यावर बोलताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते काही मुर्ख होते का असं वाचाळवीरपणा गायकवाडांनी केला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांबद्दलही अपशब्द वापरले.
वाघाच्या शिकारीचा दावा – फेब्रुवारी 2024
सन 1987 साली आपण वाघ मारला होता आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय असा दावा संजय गायकवाड यांनी केला होता.
शेती बळकावल्याचा आरोप आणि अॅट्रॉसिटी प्रकरण (जुलै 2021 आणि फेब्रुवारी 2024)
2021 मध्ये गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला. त्यांनी एका गावात कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे वक्तव्य केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. दोन्ही प्रकरणांमध्ये गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. शेती बळकावण्याच्या प्रकरणात न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले.
शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ
संजय गायकवाड यांनी एका शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली होती. तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
एकंदरीत आमदार संजय गायकवाड हे हिंसात्मक वृत्तीचे, अतिशयोक्ती आणि बळाचा वापर करणारे असंच चित्र आहे. असं असलं तरी सत्ताधारी महायुती असो वा त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे असो, संजय गायकवाडांची प्रत्येक कृती पाठीशी घातली जाते असंच सध्याचं चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.