Shivsena UBT MP: “15 कोटी तर फक्त अॅडव्हान्स, किंमत 50 कोटी ठरलीय!” पचास खोके…ठाकरेंची शिवसेनेच्या फुटणाऱ्या खासदारांना काय मिळणार? संजय राऊतांनी सांगून टाकलं
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं होतं. एकीकडे अशा बातम्यांना उधाण आलं असतानाच, शिवसेना (UBT) पक्षाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र ‘खासदार फुटी’च्या बातम्यांना बळ देणारं ठरलं आहे. रविवारपासून या चर्चांनी जोर धरला होता तर या पक्षप्रवेशावरती आता शिक्कामोर्तब झालं आहे. तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राज्यसभा खासदार आणि शिवसेना (UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत सोशल मिडीया एक्सवरील पोस्ट या ‘खासदार फुटी’ला बळ देणारी ठरली आहे.
Shivsena UBT MP: मातोश्रीवरील बैठकीला दांडी अन् चर्चांना उधाण
रविवारी (14 जूनला) उद्धव ठाकरे यांनी त्यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला पाच खासदार प्रत्यक्षरित्या उपस्थित न राहता, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तेव्हापासूनच ‘खासदार फुटी’च्या चर्चांना वेग आला होता. या मातोश्रीवरील बैठकीला यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष हजर नव्हते. तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे बैठकीसाठी मातोश्रीवरती उपस्थित होते.
Shivsena UBT MP: संजय राऊतांकडून पुन्हा ‘पचास खोके’ची पोस्ट
काल (मंगळवारी 16 जून) संध्याकाळीनंतर अचानक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या वार्ता पसरल्या. त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या, किती खासदार फुटणार, कोण फुटणार, याच्या बातम्या माध्यमांवर झळकू लागल्या. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे या बातम्या काही प्रमाणात खऱ्या असल्याचं दिसून आलं. संजय राऊत यांनी सोशल मिडीयावर, “अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!”
माझ्या स्वप्नातील पैसा पैसा!
नाही नाही — महुआ जी, किमान आधारभूत किंमत ₹५० कोटी प्रति खासदार निश्चित केली आहे.(पचास खोके)
₹ 15 कोटी फक्त आगाऊ आहे.
खरे सांगायचे तर, या लोकांची किंमत ₹५०,००० देखील नाही.
शिवसेना आणि टीएमसीच्या ब्रँड लेबलमुळे त्यांची किंमत वाढली आहे. https://t.co/Srzjgg4DkX— संजय राऊत (@rautsanjay61) १७ जून २०२६
तर संजय राऊत यांच्या या सोशल मीडिया पोस्टला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी शेअर करत म्हटलं की, “फक्त 15 कोटी? इतक्या स्वस्तात का जात आहेत? आमच्या पक्षातल्या (फुटिरांना) 4 कोटी रुपये मिळाले आणि पुढच्या 36 महिन्यांच्या टर्ममध्ये प्रत्येक महिन्याला 1 कोटी मिळणार आहेत. हनी प्लस मनी” अशी पोस्ट केली, तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 28 पैकी 20 खासदारांनी नुकतीच बंडखोरी केली, या संदर्भात मोईत्रा यांनी ही पोस्ट केली तर आज (17 जून) सकाळी महुआ मोईत्रा यांच्या या पोस्टला संजय राऊत यांनी रिप्लाय करत त्यांनी म्हटलं की, “अपना सपना मनी मनी! नाही नाही, महुआ जी, प्रत्येक खासदाराची किमान आधारभूत किंमत 50 कोटी रुपये (पचास खोके) ठरली आहे. 15 कोटी फक्त अॅडव्हान्स आहेत. मोकळेपणाने सांगायचं तर, त्यांची लायकी 50 हजारांच्या किंमतीची नाहीय. त्यांची किंमत वाढलीय, कारण शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस ब्रँड लेबल आहेत.”
Shivsena UBT MP: काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Comments are closed.