पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारीचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी

पुणे : महापालिकेत एकहाती सत्ता कशी मिळेल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेसाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक एका हॉटेलमध्ये झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक (Election) मुख्य गणेश बीडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून भाजपची यादी निश्चित झाल्याचे समजते. भाजपकडून 100 हून अधिक जुन्याच नगरसेवकांना संधी दिली जात असून ही यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच पोहोचणार आहे.

सन2017 मधील नगरसेवकांना भाजप पुन्हा संधी देणार आहे. त्यानुसार, भाजपकडून 100 उमेदवारांची यादी फायनल झाली असून त्यात माजी नगरसेवकांची नावंही फायनल झाल्याची माहिती आहे. पुण्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघातील आढावा घेऊन जुन्या नगरसेवकांना संधी देण्याचं भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. भाजपचे 2017 मध्ये 99 उमेदवार निवडून आले होते, तर एकाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांवेळी ठाकरे गटातील 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे, या सर्व नगरसेवकांसह 125 जागा निवडून आणण्याचा भाजपचा दावा आहे. पुण्यातील भाजप आमदार आणि स्थानिक नेते देवेंद्र फडणवीसांकडे त्यांची यादी सादर करणार आहेत. त्यामुळे, भाजपच्या या यादीत किती आणि कोणत्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात महापालिकेच्या 162 जागा

162 पैकी 99 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. हा निकाल पुण्यातील मध्यमवर्गीय, आयटी कर्मचारी आणि नव्या मतदारांचा कल भाजपकडे वळल्याचे दर्शवणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 39 जागा मिळाल्या, मात्र काँग्रेस 9 आणि शिवसेनेला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेने 2 आणि AIMIM 1 जागा मिळवली, मात्र, यांचा प्रभाव मर्यादित राहिला. तर 4 जागा अपक्ष उमेदवारांनी मिळवल्या होत्या. या निकालानंतर पुण्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही भाजपचे वर्चस्व कायम राहिले. त्यामुळे भाजप हा पुण्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित झाला.

नवी मुंबईत वाटाघाटी सुरूच, भाजप 80 जागांसाठी आग्रही

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना युतीची दुसरी बैठक पार पडली आहे, भाजपाकडून 80 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. तर शिवसेनेने भाजपापुढे 57 जागांचा प्रस्ताव मांडला आहे. महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक संख्या आहे, त्यामुळे युती करण्यास अडचण निर्माण होत आहे. एकाच घरात तीन ते चार सीट देण्यास आपला विरोध आहे, भाजपात हे होऊ देणार नाही, याबाबत वरिष्ठांना सांगणार अशी भूमिका भाजप नेत्या तथा आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणूकीत संदीप नाईक यांनी बंडखोरी केली असताना बेलापूर विधानसभेतील सर्व 25 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. संदीप नाईक यांचा परत भाजपा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक परत भाजपात आले आहेत. मात्र, मला विधानसभेत निवडून आणणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे भांडणार, असेही मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा

उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप

आणखी वाचा

Comments are closed.