‘NEET’ पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं

राज ठाकरे: मुंबई : देशभरात नीट परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीवरुन गोंधळ सुरू असून एनटीएने परीक्षा रद्द केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे सीबीआयने पेपरफुटीप्रकरणात जोमाने कारवाईला सुरुवात केली असून महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकमधून आत्तापर्यंत 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलं असून तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी. विजय थपलती यांनी तर नीट परीक्षाच (Exam) घ्यायला नको, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. आता, विजय यांच्या भूमिकेला मनसेप्रमुख राज ठाकरे पाठिंबा दिला असून माझ्यासारखाच दक्षिणेतील नेत्यांनी देखील NEET परीक्षेला विरोध केला असून ही परीक्षाच रद्द करा असे सूचवल्याचे राज ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरेंनी आज ट्विटरवरुन नीट परीक्षेसंदर्भात महत्त्वाची आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली. तसेच, परीक्षेचे दक्षिण-उत्तर असे गणितही त्यांनी समजावून सांगितलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनीही या परीक्षेला विरोध कर नीट परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली होती, त्यावरूनही राज यांनी भाष्य केलं.

नीट परीक्षेला माझ्या सारखाच विरोध दक्षिणेतील नेत्यांनी पण केला. सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण ‘NEET’ रद्द करा म्हणून आग्रह धरत आहेत. कारण दक्षिणेतील 5 राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास 350 च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि वरती उत्तरेतली मोठ्या राज्यांमध्ये फक्त 180 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामुळे उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टाहास 2016 पासून सुरु आहे. आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसचं सगळ्यात मोठं जाळं उत्तरेतल्या राज्यांत आहे. आणि व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट माहित आहे, असे म्हणत नीट परीक्षेच्या जाळ्यात अडकलेल्या कोचिंग क्लासेसचा ही मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, प्रश्न इतकाच आहे की अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर्स बाहेर पडतील त्यांच्या हातात आपण आपलं आरोग्य देणार आहोत का? आणि का तर केंद्राला वाटलं की यापुढे मेडिकल प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी म्हणून? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा सरकारचा इव्हेंट

माझी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना पण विनंती आहे की जरा पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा. हे ‘NEET’ वैगरे काही नको आपल्याला. आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी घेणंदेणं आहे. महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय तुमचा? सध्या पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो संपूर्ण सरकारचा इव्हेन्ट सुरु आहे त्यातून बाहेर या. तुम्ही जे हे सगळं करत आहात हे एक दिवसाचं आणि एका फोटोपुरतं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम ( ठाम म्हणजे राज्याच्या हिताची, नाही तर केंद्र जे सांगेल त्याला रेटून हो म्हणणं याला ठाम भूमिका म्हणतील)  भूमिका घ्या, असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंचा राजीनामा; विधानपरिषदेनंतर नाराजी, कुठल्या पक्षात जाणार?

आणखी वाचा

Comments are closed.