बाळासाहेबांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस असल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंना देशभरातून वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात असताना, दुसरीकडे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. ठाकरे बंधूंनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये काढलेल्या विजयी जल्लोष मोर्चावरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. यावेळी, बाळासाहेबांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो? असा सवाल करत उद्धव ठाकरे जोरदार टीका केली.

राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला. नीट पेपरफुटीवरुन सुरू झालेल्या या आंदोलनावरुन देशभरात सरकारविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. तर, ठाकरे बंधूंनी देखील या आंदोलनास पाठिंबा देत थेट सहभाग नोंदवला होता. त्याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंनी मुंबईत विजयी जल्लोष साजरा केला. त्यासाठी, मोठ्या संख्येने युवक शिवाजी पार्क मैदानात जमले होते. त्यावरुन, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या जल्लोषावर हल्लाबोल करण्यात आलाय.

महाराष्ट्राचं हे दुर्दैवच आहे, ठाकरेंना महाराष्ट्राचे कर्ते समजत होते. मात्र, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी बाळासाहेब यांच्या दोन्ही वारसांना झुरळाला विष्णूचा अवतार म्हणावं लागतं आहे. काल कोण जेन-झी होते, तुम्ही मराठी बोलत नाहीत म्हणून तरुणांना मारणारे, तिथं तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजीही बोलत होते. तुमचं राजकीय अस्तित्व कमी होत चाललंय त्यासाठी तुम्हाला असा आधार घ्यावा लागतो. महाराष्ट्र तुमच्याकडे आदराने पाहतो. आता तसं काही राहिलं नाही, बडा घर पोकळ वासा आहे, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

राज ठाकरेंना असा आधार घ्यावा लागतोय

मला या गोष्टीचा वाईट वाटतं की, राज ठाकरे यांना असा आधार घ्यावा लागतो. हा आम्हाला धक्का आहे, राज ठाकरे महाराष्ट्रातून देशाचा वातावरण फिरवू शकतात, पण दुर्दैव आहे की, त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव नाही. झिंज्याने झिंज्या उपटल्या हा अत्यंत भद्दा विनोद आहे, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली देखील उडवली.

बाळासाहेबांचा नातू स्वत:ला झुरळ समजतो

विष्णू झुरळाचा अवतार आहे, हा नवीनच अवतार आम्हाला कळाला. उद्धव ठाकरेंमुळे हे आम्हाला माहित पडलं. जसं मशालीने लंका जाळली तसा हा नवा आविष्कार. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वेदना झाल्या असतील, त्यांना वाघ म्हटलं जायचं त्यांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो. तर बाप काय, हा प्रश्न आहे, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा

MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘ती’ तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?

Comments are closed.