पुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणते दादा? मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘गुगली टाकली तरी मी सावध…’

पुणे: राज्यात शपथविधी, खातेवाटप झाल्यानंतर आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष पालकमंत्री पदे कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील काही महत्त्वांच्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणत्या पुण्याच्या कोणत्या दादांकडे जाणार? याबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत, पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांना मिळणार की चंद्रकांत पाटील यांना याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. अशातच यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावरती आपली गुगली टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणालेत मुरलीधर मोहोळ?

पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबतचा प्रश्न केला, त्यावर बोलताना मोहोळ म्हणाले, आमच्याकडे या स्तरावरती काही ठरत नाही. आमचे नेते त्याच्यावर निर्णय घेत असतात, पालकमंत्रिबाबत महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय घेतील. फक्त पुण्याचे नाही तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचे निर्णय होतील असं ते यावेळी म्हणालेत.

तर पुन्हा एकदा पत्रकारांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते दादा यावेत असं वाटतं या प्रश्नावर पुन्हा उत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, तुम्ही कशीही गुगली टाकली तरी मी सावध आहे. यॉर्कर टाका, गुगली टाका मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललो आहे. खातेवाटप एकमताने झाले आहे, आता ज्या -त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना एकमताने होतील. याबाबत कोणतीही शंका माझ्या मनात नाही, तुम्हीसुद्धा ठेवू नका, असं पुढे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी दोन दादांमध्ये चुरशीची शक्यता

बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघामधून विजयी झाले. कोथरूडमध्ये तिरंगी लढत झाली होती, त्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी मोठा विजय मिळवला होता. अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते कायम ठेवण्यात आलं. आलं आहे, दोन्ही नेते पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवेळी पुण्याचे पालकमंत्रीपद आधी चंद्रकांच पाटलांकडे होते, मात्र, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा महायुतीमध्ये सामील झाली तेव्हापासून पुन्हा पुण्याचं पालकमंत्री पद हे अजित पवारांकडे आलं तर सोलापुरचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे गेलं होतं. मात्र, आता पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जातं, याकडे लक्ष लागलं आहे.

पुण्यासह या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासाठी चुरस

पुण्यासह रायगड, ठाणेबीड, नाशिक आणि संभाजीनगर या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. बीडमध्ये मुंडे बहीण-भावांमध्ये कोणाला पालकमंत्रिपद मिळणार? अशी चर्चा आहे, तर बीड मतदारसंघाचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी घ्यावं आणि त्याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशा देखील चर्चा आहेत,  कोणाच्या पारड्यात कोणतं पालकमंत्रिपद जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.