पुण्यातील 60 जणांच्या घरावर ATS चे एकाचवेळी छापे; 51 जणांची चौकशी, धाड टाकताच काय काय सापडलं?
पुण्यात एटीएसची कारवाई महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई करत काल दिवसभरात 51 जणांना ताब्यात (ATS Action In Pune) घेऊन त्यांची कसून चौकशी केली. प्राथमिक चौकशीनंतर या सर्व 51 जणांना सोडून देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या मोबाईल फोनसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ATS ने पुढील तपासासाठी ताब्यात ठेवली आहेत. या उपकरणांच्या तपासात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास संबंधितांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
ATS च्या प्राथमिक तपासात हे तरुण पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी याच्याशी संबंधित सोशल मीडिया हँडल्सशी जोडले गेल्याचे समोर आले आहे. संबंधित सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट लाईक करणे, त्यावर प्रतिक्रिया देणे किंवा कमेंट करणे, अशा ऑनलाइन हालचालींमुळे हे सर्वजण ATS च्या रडारवर आले होते. या कारवाईत सर्वाधिक 33 तरुण पुणे शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोथरूड, येरवडा, पर्वती, विश्रांतवाडी, फरासखाना, कोंढवा तसेच इतर परिसरातील तरुणांचा समावेश आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील संशयितांवरही एकाचवेळी कारवाई करण्यात आली.
मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी- (ATS Action In Pune)
ATS ने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधितांच्या घरांवर धाडी टाकत मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी सुरू केली आहे. सोशल मीडिया अकाउंटची अॅक्टिव्हिटी, चॅट्स, संपर्कातील व्यक्ती तसेच परदेशी सोशल मीडिया हँडल्सशी असलेल्या संपर्काची बारकाईने पडताळणी केली जात आहे.
संशयास्पद आर्थिक व्यवहारप्रकरणी सोलापुरातील NGO वर ATS ची कारवाई; एका पदाधिकाऱ्याला अटक- (ATS Action In Solapur)
सोलापूरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी न करता संस्थेने तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचा आरोप असून, या प्रकरणी संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात संस्थेने चुकीचे नोंदणी क्रमांक वापरून आयकर विभाग, देणगीदार आणि शासनाची फसवणूक केल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या तिघांपैकी एका पदाधिकाऱ्याला ATS ने अटक केली असून, त्याच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचे संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली आहे. सोलापुरातील ही संस्था सुरू करण्यासाठी एका परदेशी संस्थेकडून 8 लाख रुपयांची देणगी मिळाल्याचेही तपासात समोर आले आहे. संबंधित परदेशी संस्थेचीही ATS मार्फत चौकशी करण्यात आली असून, त्या संस्थेच्या 15 बँक खात्यांतून तब्बल 126 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील संस्था आणि संबंधित परदेशी संस्थेकडे जमा झालेला निधी नेमका कशासाठी वापरला गेला, तसेच या पैशाचा वापर देशविघातक कृत्यांसाठी झाला का, या सर्व बाबींचा सखोल तपास मुंबई ATS करत आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा नियमित जामीन अर्ज तसेच अन्य दोन पदाधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. ही माहिती सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी दिली.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधि बातमी:
Comments are closed.