मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शेतकरी, दिव्यांगांसाठी लढाई लढणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे विलिनीकरण करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतली. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी भूमिका मांडताना, आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम आहे. शेतकरी बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या कामांसाठीच आपण शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, मी भाजपसोबत (BJP) मॅच होऊ शकत नाही, म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलं.

बच्चू कडू यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्यादिवशीच रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिव्यांग मंत्रालय, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करीत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ही कामे मार्गी लागत आहेत, यापुढेही लॉगतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, मी भाजपसोबत मॅच होत नाही, या कडू यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तर, बच्चू कडू हे हाडाचे शिवसैनिक आहेत, त्यांनी यापूर्वी शिवसेनेत काम केलंय, असे एकनाथ शिंदेंनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं.

नेत्यांनी परप्रांतीयांच्या पोटावर मारू नये – कडू

महाराष्ट्र दिनी आणि शिवसेनेत सुरू असलेल्या मराठीच्या मुद्दयावर बच्चु कडू यांनी मोठं विधान केलं. परप्रांतीयांना मराठी येत नसेल तर त्यांनी शिकलं पाहिजे. मात्र, नेत्यांनी त्यांच्या पोटावर मारु नये असेही बच्चू कडू यांनी म्हटलं. संत ज्ञानेश्वरांच्या हे विश्वची माझे घर या ओवींची आठवण करुन देत मानवातील युद्ध नव्हे तर मानवता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केलं.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातील महाराष्ट्राची आठवण करून देत मराठीच्या मुद्दयावर कोणाची पोटमारी होऊ नये, असे परखड मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

बच्चू कडूच्या शिवसेना प्रवेशाला परभणीती प्रहारचा विरोध

बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने आता प्रहार मधूनच त्यांना विरोध सुरू झालाय. परभणीच्या प्रहार जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडूंच्या प्रवेशाला विरोध करत बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतलाय. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नसल्याचे स्पष्ट केले. आज प्रहार संघटनेच्या परभणीतील पदाधिकाऱ्यांनी सावली विश्रामगृहात बैठक घेत हा निर्णय घेतलाय. या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीवरील प्रहारचे नावही काढून टाकले. भविष्यामध्ये आम्ही कुठे जायचे हा निर्णय हे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागच्या आठ ते दहा वर्षापासून बच्चू कडूंच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याची खंत जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका

आणखी वाचा

Comments are closed.