पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी, राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष, कोणत्या पक्षासोबत जातोय, महायुती आणि महाविकास आघाडीत कोण-कुणासोबत युती व आघाडी करतोय, हे पाहून सगळंच मतदार चक्रावल्याचं दिसून येत आहे. कारण, महायुती म्हणणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून केवळ एका महापालिकेत जागावाटपाचा फॉर्म्युला झाला आहे. अद्यापही इतर महापालिकेत कुठे चर्चा सुरू आहे, तर कुठे वेगळ्याच युती पाहायला मिळत आहेत. आता, पुण्यात (Pune) भाजपा-शिवसेना यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेत युती फिस्कटली की काय असेच चित्र आहे. कारण, पुण्यातील शिवसेनेनं (Shivsena) आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राज्यात केवळ कोल्हापुरातच यशस्वी महायुती झाली आहे. इथे भाजप 36, शिवसेना शिंदे गट 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस AP 15 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दोन दिवस मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी  घोषणा केली. जागा वाटपामध्ये भाजप कोल्हापूर शहरांमध्ये सर्वात मोठा भाऊ ठरला. तर, मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती असून 20 जागांवर त्यांचं घोडं अडलं आहे. आता, पुण्यात वेगळाच ट्विस्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईनंतर सर्वांचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येणार आहे. मात्र, भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला 35 ते 40 जागांचा प्रस्ताव घेऊन शिवसेना नेते अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. भाजपकडून “सन्मानपूर्वक” जागा न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या युतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपवार दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपकडून 15 अधिक 1 म्हणजेच 16 जागांचा प्रस्ताव शिवसेनपुढे ठेवला आहे. मात्र, शिवसेना किमान 25 जागांवर ठाम होती. काल आणि आज भाजपकडून उत्तरं मिळाली नसल्यामुळे शिवसेनेने अजित पवारांची घेतली भेटल्याची विश्वस्वनीय सूत्रांची माहिती आहे.

रविंद्र धंगेकर अजित पवारांना भेटले

जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात ‘आग्या’ मोहोळ उठवणारे शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोंडी झाली आहे. त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारण्यात आल्याने धंगेकर कोणता वेगळा निर्णय घेणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत

हेही वाचा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

आणखी वाचा

Comments are closed.