शिवसेनेच्या आमदारांनी युतीधर्म पाळावा, कोकणची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर शिंदेंच्या सूचना

मुंबई : कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेना आमदारांनी युतीधर्म पाळावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि नेत्यांना दिल्या. कोकणच्या जागेवरून एकनाथ शिंदे यांनी कोकणच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर आता राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे, विकास गोगावले  आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. कोकणची जागा आता राष्ट्रवादीला गेली असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणची जागा जरी राष्ट्रवादीला गेली असली तरी त्या बदल्यात शिवसेनेला रायगडचे पालकमंत्रिपद मिळणार की नाही याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला

महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाचं त्रांगडं अखेर सुटलं आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असताना महायुतीने त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. एकूण 17 जागांमध्ये भाजप 11 जागा लढवणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना 4 जागांवर लढणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत.

विधान परिषदेच्या 17 जागांपैकी किमान सात जागा या आपल्याला मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी चांगलाच जोरही लावला होता. जागावाटपाच्या या चर्चा दिल्लीपर्यंतही गेल्या. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या 4४ जागा आल्या आहेत.. यामध्ये ठाणेनाशिक, परभणी आणि यवतमाळच्या जागेचा समावेश आहे..

यासोबत सुरुवातीला राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, आता अंतिम जागावाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि कोकण या दोन जागा आल्या आहेत. केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतरच या महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अनिकेत तटकरे अर्ज भरणार

कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानं खासदार सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज घेतला. ते सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जागावाटपात कोकणाची जागा राष्ट्रवादीला सुटली असली तरी शिवसेनेनंही या जागेवर दावा केला होता. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलं आहे.

या जागेसाठी शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंचे पुत्रही इच्छुक होते. त्यामुळे कोकणची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं शिवसेनेचे भरत गोगावले काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या निर्णयापुढे आम्ही जाणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली. तर एकनाथ शिंदे दिलखुलास नेतृत्व असं म्हणत सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.