मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटीचं पॅकेज


मुंबई : राज्यातील ओव्हरफोर्स शेतकऱ्यांना (शेतकरी) सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आजच शेतकऱ्यांसाठी विशिष्ट पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती, दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होईल, असेही मुख्यमंत्र्‍यांनी यापूर्वी सांगितले होते. दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिल्याने आता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी अखेर मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यातच, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपया मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.

शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळीच फोन केला. विम्या संदर्भात बैठक घेत तातडीनं योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल, व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर ताण सहन करावा लागेल, इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल, आत्ताच सांगता येत नाही. पण, शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देणं सुरु करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही फडणवीसांनी म्हटलं.

253 तालुक्यांना सरसकट मदत

राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झालं आहे, साधारणपणे जास्तीचं नुकसान 29 जिल्ह्यात झालं असून आपण 253 तालुके सरसकट घेतले आहेत. त्यामध्ये, 2 हजार 59 मंडळं आहेत, जिथं 65 मिमीची अट ठेवलेली नाही. त्याठिकाणी सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आपण करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

दिवाळीआधी पैसे देण्याचा प्रयत्न

मराठवाड्यातील परभणी, वाशिमजालना, यवतमाळ या जिल्ह्यात 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झालं आहे. संभाजीनगरमध्ये 75 टक्क्यांहून अधिक नुकसान आहे, तर सोलापूर धाराशिवमध्ये 80 टक्क्यांहून अधिकचं नुकसान आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा दिवाळी पैसे आधी देता येईल, यासाठी प्रयत्न राहिल. मृत व्यक्तींचे सहाय्य आधीच दिले आहेत. काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत, त्या दिवाळी आधीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास 18 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे क्रॉप कम्पेन्शेसनमधून आम्ही देतोय. चार पैसे आम्ही कमी खर्च करु आणि मदत करू, असे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्हाला पैसे दिले आहेत, काहींनी सीएसआर देण्याचे मान्य केले आहे. शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये ते यातून खर्च करू असा प्रयत्न राहिल, अशी माहितही फडणवीसांनी दिली.

जमीन वाहून गेलेल्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपये (Farmers flood affected)

राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी (marathwada farmers package)

दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत

गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार

कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी

नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने  बांधण्यासाठी मदत

डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत

झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार

पीक नुकसानभरपाई (Farmers crop insurance)

शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये

हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई – हेक्टरी 27 हजार रुपये

बागायती शेती नुकसान भरपाई – हेक्टरी 32 हजार रुपये

विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये

कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार

बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.

काही राहून गेलं तर समावेश करू – अजित पवार

दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ आणि केंद्राचे नॉर्म्स असतात, त्यावरील भार आम्ही उचलला आहे. बारकाईने विचार करत कोणताही घटक वंचित राहणार नाही असा विचार केलाय. भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, जर काही राहून गेलं तर त्याचा समावेश करण्याची देखील आमची तयारी आहे, अशी माहिती यावेळी उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ही अंतिम मदत नाही, टोकाचं पाऊल उचलू नये

शेतकऱ्यांसमोरील संकट मोठं होतं, प्रत्यक्ष बांधावर जात आम्ही नुकसान पाहिलं. त्यामुळे, तात्काळ 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 65 लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांवरील संकट मोठं होतं, आम्ही इतका मोठा पाऊस पाहिला नाही. प्रसंग मोठा होता, अशात आमच्या बैठका झाल्या आणि महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. विरोधक एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या असं सांगत होते, आम्ही कर्तव्य भावनेतून सर्व सांगितलं आहे. उभी पिकं आडवी झाली होती, जमिनी कापल्या गेल्या आहेत. पशूधन वाहून गेलं, जिवितहानी झाली आहे, अशा प्रसंगात शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं भाष्य आम्ही केलं होतं. अशात मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, ही अंतिम मदत नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, शासन खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहे, असेही शिंदेंनी म्हटले.

केंद्र सरकार देखील मदत देईल

तामिळनाडू आणि पंजाबपेक्षा अधिक मोठं आमचं पॅकेज आहे, शेतकऱ्यांना काय हवं आहे? त्यापेक्षाही अधिक मदत होईल असा प्रयत्न आम्ही केलाय. जमीन पूर्वव्रत करणं सोपं नाही. मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला असेल तर त्यातही सहकार्य करणार आहोत. 2 हेक्टरची मर्यादा आहे ती काढा अशी मागणी होती, तर आम्ही ती मर्यादा वाढवली आहे. पिक विम्याची रक्कम देखील ॲड होणार आहे, असेही शिंदेंनी सांगितले. जे जे उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत, सर्व निकष बाजूला ठेवत शेतकरी केंद्रबिंदू ठेवला आहे. कितीही ओढाताण असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ व्यतिरिक्त अतिरिक्त 10 हजार मदत आपण करणार आहोत. गृहमंत्री अमित शाह आले तेव्हा त्यांना आपण विनंती केली होती. केंद्राची मदत देखील झाली पाहिजे असं सांगितलं होतं, महाराष्ट्र सरकारच्या मागे केंद्र सरकार उभं राहिलं. यावेळचं संकट बघता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीचे नुकसान झाले आहे, त्यात मदतीचा हात सरकार देईलच, सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकरी आपला मायबाप आहे, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम आपण करू, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=zvvcqqs40oo

हेही वाचा

मोदींना विचारलं आंबा कसा खाता? ट्रोल होऊनही अक्षय कुमारने फडणवीसांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, म्हणाला…

Comments are closed.