संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आमदार प्रमोद जठारांचं वक्त
नागपूर : भाजपने नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतून भाजपचे (BJP) निष्ठावंत समर्थक प्रमोद जठार (Pramod Jathar) यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर, ते बिनविरोध आमदार बनले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील विश्वास, विकास आणि जनकल्याणाच्या कारभाराची माहिती देत त्यांनी कौतुक केलंय. यावेळी, राम मंदिर, आर्टीकल 370 यांसारख्या मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) कामकाजाची उजळणी केली. मात्र, दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु आणि संविधानकर्त्यांना जे जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं असेही त्यांनी म्हटलं. आमदार जठार यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, संविधानकर्त्यांना म्हणत एकप्रकारे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जे जमला नाही, ते मोदींनी केल्याचं त्यांनी म्हटलं.
मोदी सरकारने 12 वर्षे काम केलंय, पुढील 12 वर्षांसाठी आता प्रत्येक कार्यकर्त्याने आपले संकल्प केले पाहिजे, असे प्रमोद जठार यांनी म्हटलं. तसेच, मोदींच्या गत 12 वर्षांच्या काळात देशात मोठा बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं. राम मंदिराचा विषय 500 वर्षे खितपत पडला होता, पंतप्रधान मोदींनी तो प्रश्न सोडवला, त्यामुळेच मोदी है तो मुमकिन है, असे आमदार प्रमोद जठार यांनी म्हटलं. काश्मीरमधील आर्टिकल 370 कलम हात लावण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती, ना नेहरूंमध्ये, ना संविधानकर्त्यांमध्ये. मात्र, सत्तर वर्षांचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक टाचणी देखील न पडू देता सोडवला. रक्ताचा तर सोडा, घामाचा देखील एक थेंब तिथं सांडला नाही, असेही आमदार जठार यांनी म्हटले. प्रमोद जठार यांनी एकप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पूर्वी शंभर गोळ्या आल्या की आम्हाला एक गोळी मरण्याची परवानगी होती. आता आम्हाला गोळ्यांचा हिशोब द्यावा लागायचा, आता समोरून एक गोळी आली तरी आम्ही शंभर मारतो, तरी गोळ्यांचा हिशोब द्यावा लागत नाही, असे म्हणत भारत-पाकिस्तान सीमारेषेवर परिस्थिती बदलल्याचं प्रमोद जठार यांनी सूचवलं. त्यामुळेच, जवान खुश आहेत, तर, शेतकरी देखील खुश आहेत, महिला, युवक सगळेच खुश आहेत, असेही जठार यांनी म्हटलं. मुंबई गोवा महामार्गचे काम दहा टक्के शिल्लक आहे, ते पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल. मात्र, पूर्वी 12 ते 14 तास गोव्याला जायला लागायचे, आता मुंबई ते गोवा 6 तासांत जाता येईल, असेही जठार यांनी सांगितले. दरम्यान, जगात आमच्या देशाचा GDP आज 2% आहे, चंद्रगुप्तच्या काळात 33% टक्के होता, सोन्याचा धूर येणारा आमचा देश होता, असा इतिहासही त्यांनी सांगितला.
हेही वाचा
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.