ठाकरे बंधू एकत्र आले, मुंबईत संख्याबळ किती? शिवसेना-मनसेच्या नगरसेवकांच राजकीय गणित
मुंबई : एकत्र येण्यासाठीच एकत्र आलोय, असे म्हणत शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीतल युतीचे संकेत आजच्या विजयी जल्लोष मेळाव्यातून दिले. शिवसेना-मनसे दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्द्यावरुन आज एकत्र आले होते, त्यानिमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि एमएनएस (एमएनएस) एकत्रित येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. कारण, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या वाट्याला गेले आहे. तर, उद्धव ठाकरेंना नवं नाव आणि चिन्ह घ्यावं लागलं. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत त्यांना म्हणावं तेवढं यशंही मिळालं नाही. आता, महापालिका निवडणुकांची (Election) तयारी सुरू असून ठाकरे बंधू एकत्र आल्यास निश्चितच ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा होऊ शकतो.
सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे संख्याबळ जास्त आहे. आमदार, खासदारांची संख्या मोठी आहे, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे, ठाकरे बंधूंनीही एकीची वज्रमूठ बांधल्याचं आजच्या कार्यक्रमातून दिसून आलं. मुंबई महापालिका काहीही झालं तरी भाजपला जाऊ नये, किंवा शिवसेनेचा महापालिकेवरील भगवा खाली उतरू नये, यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये ठाकरेंची ताकद किती आहे, शिवसेना-मनसेचं संख्याबळ किती आहे हे यातून पाहूयात. राज-उद्धव यांच्या युतीचा दोन्ही पक्षाला फायदा होईल का, हेही युती झाल्यास पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
मुंबई महापालिका संख्याबळ
मुंबई महापालिका 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 99 नगरसेवक होते. मात्र, शिवसेना पक्षातील फुटीनंतर सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 54 नगरसेवक आहेत. गत 2017 च्या निवडणुकीत मनसे पक्षाचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यातील एक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत आणि सहा नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याने सद्यस्थितीत मनसेकडे एकही नगरसेवक नाही.
कल्याण डोंबिवली महापालिका
शिवसेनेचे 57 नगरसेवक निवडून आले होते, शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 9 नगरसेवक आहेत. तर मनसे पक्षाचे निवडून आलेले 9 आणि एक अपक्ष मिळून 10 नगरसेवक आहेत.
ठाणे महापालिका
महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त तीन नगरसेवक आहेत. तर मनसे पक्षाचा एकही नगरसेवक सद्यस्थितीत ठाणे महापालिकेत नाही.
नवी मुंबई महापालिका
महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे 4 नगरसेवक आहेत, तर मनसेकडे एकही नगरसेवक नाही.
मध्यमक्ष –
दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि केडीएमसी या चारही महापालिका निवडणुकांमध्ये सद्यस्थितीत शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला डॅमेज कंट्रोल सोबत संघटना आणखी मजबूत करून पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे. त्यामुळे, मुंबईसह उपनगरातील प्रमुख महापालिकांवर पुन्हा सत्ता आणायची असल्यास तर मराठी मतदार एकत्र करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत मनसेकडे नगरसेवकांचा आकडा जरी बोटावर मोजण्याइतका असेल तरी पक्षाला उभारी देण्यासाठी आणि आपला मतदार आपल्यासोबत टिकून या महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी समविचारी पक्षाला सोबत घेण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे, निवडणुकांमध्ये ठाकरे बंधु एकत्र राहिल्यास निवडणूक निकालात वेगळं चित्र पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र, कुटुंब म्हणत राोहित पवारांचं सूचक ट्विट; शरद पवारांचा व्हिडिओ शेअर
आणखी वाचा
Comments are closed.