विदर्भातील विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरीचा धुमाकूळ; महायुती, महाविकास आघाडीसमोर ‘डॅमेज कंट्रोल’च
विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठ्या बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागत आहे. अमरावती, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली आहेत.
Amaravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत भाजपसमोर शिंदे गटाचे मोठे आव्हान
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीमध्ये उघड बंडखोरी पाहायला मिळत आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार ही जागा भाजपच्या (BJP) वाट्याला गेली असून, पक्षाने इथे प्रवीण पोटे (Pravin Pote) यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) माजी आमदार विप्लव बाजोरिया (Viplav Bajoria) यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विप्लव बाजोरिया हे यापूर्वी परभणी-हिंगोली मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी त्याच जागेवरून पुन्हा उमेदवारी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी थेट अमरावतीतून बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया हे देखील माजी आमदार आहेत. निवडणुकीत ऐनवेळी चमत्कार घडवण्याची क्षमता बाजोरिया गोटात असल्याने, ही बंडखोरी भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.
Bhandara Vidhan Parishad Election 2026: भंडारा-गोंदियात मविआ महायुतीत बंडखोरी
भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूला खिंडार पडले आहे. काँग्रेसने (Congress) माजी आमदार दिलीप बनसोड (Dilip Bansod) यांना एबी फॉर्म (AB Form) देऊन अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, गोंदियाचे काँग्रेसचेच माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे सुपुत्र प्रफुल अग्रवाल (Praful Agarwal) यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट अपक्ष अर्ज दाखल केला आहे, जो काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Ajit Pawar Faction) भंडारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर (Naresh Ishwarkar) आणि तुमसर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे (Abhishek Karemore) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर, भाजपचे भंडारा शहर प्रमुख सचिन कुंभलकर (Sachin Kumbhalkar) यांनीही अपक्ष म्हणून उडी घेतल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
Chandrapur Vidhan Parishad Election 2026: चंद्रपूरमध्ये अरुण लखानींविरोधात सुधीर कोठारी रिंगणात
चंद्रपूर–गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही महायुतीमधील अंतर्गत समन्वय कोलमडल्याचे दिसत आहे. ही जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला आली असून पक्षाने उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धा जिल्ह्यातील बडे नेते सुधीर कोठारी (Sudhir Kothari) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी या बंडखोरीला किरकोळ बाब मानत जास्त महत्त्व दिलेले नाही. 4 जूनपर्यंत कोठारी आपला अर्ज मागे घेतील, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे.
Yavatmal Vidhan Parishad Election 2026: यवतमाळमध्ये शिंदे गटाला भाजपचे आव्हान
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचा अंतर्गत वाद टोकाला पोहोचला आहे. जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला सुटली असून, पक्षाने विद्यमान आमदार दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा (Nitin Bhutada) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून थेट आव्हान दिले आहे. भुतडा यांचे जिल्ह्यातील राजकीय नेटवर्क पाहता, त्यांची ही उमेदवारी शिंदे गटासाठी अत्यंत तापदायक ठरू शकते. भुतडा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
एकंदरीत, विदर्भातील या चार जागांवर झालेल्या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत या बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश येते की महायुती आणि मविआला अंतर्गत लढाईचा मोठा फटका बसतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.